​वसई:- गेल्या वर्षी पालिका निवडणुकांच्या कारणास्तव रद्द झालेली वसई-विरार महापालिकेची बहुप्रतिक्षित राष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉन स्पर्धा यंदा पुन्हा एकदा पार पडणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या महासभेत या १३ व्या महापौर मॅरेथॉन स्पर्धेच्या ३.९६ कोटी रुपयांच्या खर्चाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. महापालिकेत नव्याने महापौर नियुक्त झाल्यानंतर या स्पर्धेचा मार्ग मोकळा झाला आहे.

​वसई-विरार महापालिकेकडून २०११ सालापासून दरवर्षी डिसेंबर महिन्यात या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले जाते. आतापर्यंत पालिकेच्या १२ मॅरेथॉन पार पडल्या आहेत. देशभरातील पहिल्या पाच प्रमुख राष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये या स्पर्धेचा समावेश होतो. या स्पर्धेत मुंबई, ठाणे, पालघर, पुण्यासह विविध राज्यांतून १५ हजारांहून अधिक धावपटू उत्साहाने सहभागी होतात. यामध्ये ४२ किमी पूर्ण मॅरेथॉन आणि २१ किमी अर्ध मॅरेथॉन यांसारख्या मुख्य शर्यतींसोबतच बॅटल रन, धम्माल धाव आणि व्हीलचेअर रन अशा विविध स्पर्धा रंगतात. ऑलिंपिक विजेते, नामांकित खेळाडू आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती हे या स्पर्धेचे मुख्य आकर्षण असते.

​२०२२ ते २०२४ या काळात महापालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने ही स्पर्धा ‘वसई-विरार महापालिका मॅरेथॉन’ या नावाने घेण्यात आली होती. तर २०२५ मध्ये निवडणुकांचे कारण देऊन ती रद्द करण्यात आली होती. आता महापालिकेत नवे महापौर विराजमान झाल्याने पुन्हा एकदा ही स्पर्धा ‘महापौर मॅरेथॉन’ नावाने पार पडणार आहे.

खर्चाच्या आकडेवारी वरून भाजपचा आक्षेप

​दरम्यान, महासभेत या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असली तरी खर्चाच्या आकडेवारीवरून भाजपने आक्षेप घेतला आहे. यापूर्वी ही स्पर्धा कमी खर्चात होत होती, मात्र प्रशासकीय काळात खर्चाचे आकडे वाढल्याचा आरोप नगरसेवक महेश सरवणकर यांनी केला असून त्याची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच प्रस्तावात मागील वर्षीच्या खर्चाचा स्पष्ट उल्लेख नसल्याची टीका विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी केली. यावर महापौर अजीव पाटील यांनी मॅरेथॉन संदर्भातील सर्व माहिती उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले असून, सर्वांनी एकत्र बसून त्रुटींवर चर्चा करून निर्णय घेण्याच्या सूचना महासभेत दिल्या आहेत.