वसई: वसई विरार शहरात प्रवाशांच्या आर्थिक लुटीला चाप बसावा यासाठी येत्या १५ नोव्हेंबर पासून मीटर रिक्षा धोरण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र रिक्षा चालकांना निर्माण होत असलेल्या विविध अडचणींमुळे या अंमलबजावणीला विलंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वसई विरार शहरात मोठ्या प्रमाणावर नागरिक रिक्षाने प्रवास करतात. गेल्या काही काळात वाढत्या लोकसंख्येसह शहरातील रिक्षांच्या संख्येतही वाढ झाली आहे. तर रिक्षाचे परवाने खुले झाल्यापासून रिक्षाचालकांच्या संख्येत अजूनच भर पडली आहे. पण याचबरोबर रिक्षाचालकांकडून केल्या जाणाऱ्या मुजोरीचे प्रकारही दिवसेंदिवस वाढत आहेत. तर अतिरिक्त भाडे आकारणे, प्रवाशांसोबत गैरवर्तन करणे, भाडे नाकारणे अशा समस्यांनाही नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि भाड्यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी मीटर रिक्षा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली होती. या मागणीनुसार परिवहन विभागाने येत्या १५ नोव्हेंबरपासून मीटर रिक्षा सुरू करण्यात येतील अशी घोषणा केली होती. मात्र हा निर्णय लागू होण्याआधी रिक्षा चालक व मालक यांना निर्माण होणाऱ्या समस्या ही समजून घेणे आवश्यक आहे.

याच पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी वसई-विरार महापालिकेच्या सभागृहात आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दिपक सावंत, सहायक परिवहन अधिकारी दिपक उगळे, सहायक पोलीस आयुक्त २ ( वाहतूक ) शंकर इंदलकर, आणि परिवहन व वाहतूक विभागाचे इतर अधिकारी यांची रिक्षाचालक-मालक संघटनांच्या सदस्यांसोबत एक महत्त्वाची बैठक पार पडली.

या बैठकीत रिक्षाचालकांनी मीटरच्या संदर्भात विविध समस्या मांडल्या यात प्रामुख्याने विनापरवाना रिक्षा चालविणारे चालक, रस्त्यांची झालेली दुरावस्था, अपुरे सीएनजी पंप, मीटर रिकेलिब्रेशमध्ये येत असलेल्या अडचणी, प्रवासी व रिक्षाचालक यांच्यात जनजागृतीचा अभाव या समस्यांचा समावेश होता.

या समस्या समजून घेत जुनी व्यवस्था बंद करून नवी व्यवस्था लागू करणार नसल्याचे आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी सांगितले. तसेच चालक मालक संघटनांचे सदस्य, ज्येष्ठ रिक्षा चालक, महापालिका अधिकारी, परिवहन अधिकारी अशी १० ते १५ जणांची समिती गठीत करून रिक्षा चालकांच्या समस्यांचा आढावा घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनीही सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले.

मीटर रिक्षा धोरणाला विरोध

काही रिक्षा चालकांनी मीटर रिक्षाचे स्वागत केले असले तरी काही रिक्षा चालक मीटर प्रमाणे रिक्षा धोरणाला विरोध दर्शविला आहे. मीटर प्रमाणे रिक्षा सुरू करताना रिक्षा चालकांना भेडसावत असलेल्या समस्या आहेत त्यावर मार्ग काढावा नंतरच हे धोरण लागू करावे अशी भूमिका रिक्षा चालकांनी मांडली.

मीटर चालू करण्यासाठी येणारा दंड माफ करा

वसई विरार शहरात बहुतांश रिक्षा चालकांनी मीटरचे रिकेलिब्रेशन करून घेतले नाही त्यामुळे त्यासाठी त्यांना परिवहन विभागाकडून पाच हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. त्यामुळे मीटर रिक्षा सुरू करायची झाल्यास आधी हा दंड भरावा लागेल त्यामुळे रिक्षाचालकांना ही मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे असे रिक्षा चालक मालक महासंघाचे अध्यक्ष विजय खेतले यांनी सांगितले आहे. यासाठी हा दंड कसा स्थगित होईल यासाठी निर्णय घेण्यात यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. जर रिक्षा चालक आणि प्रवासी यांच्यात आधी समन्वय साधला जाणे गरजेचे आहे. त्यासाठी ही प्रयत्न झाले पाहिजे तरच मीटर प्रमाणे रिक्षा चालविणे शक्य होणार असल्याचे मत रिक्षा चालकांनी मांडले.