वसई: डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्ताने रविवारी नायगाव भाईंदर परिसरात स्वच्छता अभियान घेण्यात आले.यावेळी दीड टनाहून अधिक कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.
कचऱ्यामुळे सर्वत्र अस्वच्छतेचे वातावरण निर्माण होत असते त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होत असतो. सार्वजनिक ठिकाणे व आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ रहावा याबाबत जनजागृती करण्यासाठी डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे नायगाव व मीरा-भाईंदर मध्ये विविध ठिकाणी रविवारी स्वच्छता अभियान घेण्यात आले. महाराष्ट्र भुषण डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान पार पडले. या मोहीमेअंतर्गत मिरा-भाईंदर व नायगाव क्षेत्रातील मुख्य रस्ते, उप रस्ते, बाजारपेठा, सार्वजनिक ठिकाणे अशा ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली.
या स्वच्छता मोहिमेत एकूण ६०३ श्रीसदस्यांनी सहभाग घेत ३२ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची साफसफाई करत तब्बल दीड टनाहून अधिक ओला व सुका कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत दरवर्षी विविध लोकोपयोगी उपक्रम राबविले जात असून खूप मोठ्या संख्येने श्रीसदस्य या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. स्वच्छता ही काळाची गरज, स्वच्छतेतून मानवी आरोग्य तसेच स्वच्छतेतून निसर्गाचा समतोल या संकल्पनेतून स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी प्रतिष्ठानमार्फत व्यापक जनजागृतीही करण्यात येत आहे. अभियानाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
विरार मध्ये ही स्वच्छता मोहीम
विरार मध्येही सकाळी ८ वाजल्यापासून प्रतिष्ठानचे स्वयंसेवक हातात झाडू आणि कचरा संकलनाचे साहित्य घेऊन विरार-मनवेलपाडा परिसरात दाखल झाले होते. या अभियानांतर्गत मनवेलपाडा परिसर, मुख्य बाजारपेठ, हिल पार्क परिसर आणि मुख्य रस्त्यांची कसून साफसफाई करण्यात आली. साचलेला कचरा आणि प्लास्टिकचे ढीग उचलून श्री-सदस्यांनी परिसराला स्वच्छ आणि सुंदर स्वरूप प्राप्त करून स्वच्छते बाबत जनजागृती केली. संपूर्ण वसई आणि विरार मध्ये ३८४० सदस्यांनी सहभाग घेत कचरा गोळा करूनच त्याची विल्हेवाट लावली.
श्री-सदस्यांचे अनुकरण करावे लागेल – महापौर अजीव पाटील
या मोहिमेत वसई-विरार शहराचे महापौर अजीव पाटील, नगरसेवक प्रशांत राऊत, नगरसेविका संगीता भेहेरे यांच्यासह महापालिकेचे सफाई कर्मचारी आणि स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. श्री-सदस्यांची शिस्त, कामाप्रती असलेली निष्ठा आणि कोणताही गाजावाजा न करता केलेले निस्वार्थ श्रमदान पाहून शहरवासीयांनी त्यांचे विशेष कौतुक केले.
या प्रसंगी प्रतिक्रिया देताना महापौर अजीव पाटील म्हणाले, “आज जगासमोर कचऱ्याची मोठी समस्या आहे. प्रत्येक नागरिक कचरा करतो, पण साफसफाई करणारा प्रत्येक कर्मचारी हा खरा स्वच्छतादूत आहे. अशा उपक्रमांतूनच प्रत्येक नागरिकाने स्वच्छतादूत कसे व्हावे, याची प्रेरणा मिळते. इंदौरसारखे वसई-विरार शहर स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी आपल्याला श्री-सदस्यांचे अनुकरण करावे लागेल.“ आगामी अर्थसंकल्पात शहराच्या स्वच्छता आराखड्यासाठी विशेष तरतूद करण्याबाबत पालिकेचे धोरण असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
