वसई: गेल्या अनेक दिवसांपासून ज्या पावसाची प्रतीक्षा सर्वांना होती. तो अखेर आज तळकोकणात दाखल झाला आहे. पण, असे असले तरी वसई विरार शहरात मान्सून कधी दाखल होणार, असा प्रश्न आता नागरिकांना सतावू लागला आहे. आठवड्याच्या सुरुवातीला वसई विरार शहरात सलग दोन ते तीन दिवस पहाटेच्या सुमारास वळवाच्या पावसाच्या सरी बरसल्या होत्या. या मान्सूनपूर्व हालचालींमुळे वातावरणात काहीसा गारवा पसरला होता. तर दुसरीकडे ढगाळ वातावरणामुळे उन्हाची तीव्रता कमी झाल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासाही मिळाला होता.
पण, रविवार आणि बुधवारच्या तुलनेत गुरुवारपासून पुन्हा शहरातील उकाडा वाढला असल्याचे जाणवू लागले आहे. तीव्र उन्हाच्या झळा, घामाच्या धारा आणि उष्ण हवेचा होणारा मारा यामुळे वसई विरारमधील नागरिक हैराण झाले आहेत. सर्वांच्या नजरा आता पावसाच्या आगमनाकडे लागल्या आहेत. तर नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार यावर्षी गेल्यावर्षीच्या तुलनेत तीन दिवस उशिरा म्हणजे ४ जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला.
त्यानंतर उत्तरेच्या दिशेने मोसमी वाऱ्यांची वाटचाल होऊन शुक्रवार, ५ जून रोजी कर्नाटक, तामिळनाडू तसेच नैऋत्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांमध्ये पुढे सरकल्याची माहिती हवामान विभागाने दिली. तर त्यानंतर अरबी समुद्राच्या काही भागांसह गोव्यातील काही भागात मान्सूनने प्रवेश केला होता. त्यामुळे राज्यात लवकरच मान्सून दाखल होण्याचा अंदाज बांधला जात होता.
त्यानुसार शनिवारी अखेर मान्सून तळकोकणात दाखल झाला आहे. तळकोकणात पाऊस दाखल झाल्यानंतर अनेकदा मान्सून मुंबईसह उत्तरकिनारपट्टी परिसरात दाखल होतो. त्यामुळे आता येत्या काही दिवसात मुंबईसह वसई विरार शहरातही मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिक त्रस्त
वसई विरार शहरात एकीकडे नागरिक उकाड्याने त्रस्त झाले असताना, सातत्याने खंडित होणारा वीज पुरवठा, रोहित्र फुटण्याच्या घटना यामुळे यात अधिकच भर पडत आहे. दिवसातून सलग दोन ते तीन तास वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन कामांचा खोळंबा होत असून त्यांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
