वसई: जूनचा पंधरवडा उलटून गेला तरी वसई-विरारमध्ये पावसाने अद्याप म्हणावी तशी हजेरी लावलेली नाही. आता याचा थेट परिणाम शहरातील रेनकोट, छत्री आणि पावसाळी साहित्याची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर होत आहे. वाढलेले दर आणि कमी खरेदी यामुळे विक्रेते आर्थिक संकटात सापडले आहेत.
दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वसई विरार शहरात मान्सूनचे आगमन होते. पण, यंदा महिन्याची १५ तारीख उलटून गेल्यानंतरही पावसाची चिन्ह दिसेनाशी झाली आहेत. त्यातच अलनिनोच्या प्रभावामुळे यंदा मान्सून काहीसा लांबण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असल्यामुळे अजून काहीकाळ शहरात जाणवणाऱ्या या उन्हाळ्याचा झळांचा सामना करावा लागणार आहे, अशी नागरिकांची खात्री पटली आहे.
पावसाने दडी मारल्यामुळे एकीकडे नागरिक त्रस्त झाले असताना आता दुसरीकडे पावसाळी हंगामी व्यवसायांनाही याचा फटका बसू लागला आहे. मे महिन्याचा शेवट उजाडला की वसई, विरार, नालासोपारा आणि नायगाव शहरातील बाजारपेठा रंगीबेरंगी छत्र्या, विविध प्रकारचे रेनकोट, पावसाळी चपला यांसारख्या साहित्याने सजलेली दुकाने थाटली जातात. यंदाही बाजारात अशीच दुकाने थाटण्यात आली आहेत.
तर दुसरीकडे गेल्यावर्षीच्या तुलनेत पावसाळी साहित्याच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. नेहमीची साधी काळी छत्री आता १५० ते २०० रुपयांच्या घरात गेली आहे. लहान मुलांच्या फॅन्सी आणि थ्री-फोल्ड छत्र्यांचे दर २५० रुपयांपासून थेट ७०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. तर बाजारात नेहमी वापरले जाणारे पीव्हीसी आणि पॉलिस्टर रेनकोट ५०० रुपयांपासून १५०० रुपयांपर्यंत मिळत आहेत. तर दुचाकी चालक आणि नोकरदारांसाठीचे ब्रँडेड व प्रीमियम दर्जाचे रेनकोट १५०० ते ४००० रुपयांपेक्षा जास्त किंमतीत विकले जात आहेत.
दरवर्षी पावसाळा तोंडावर आल्याने नागरिक छत्री आणि रेनकोटच्या खरेदीसाठी गर्दी करतात. मात्रयंदा जून महिना संपत आला तरी कडक ऊन आणि उकाडा कायम असल्याने नागरिकांकडून फक्त चौकशी होत आहे, प्रत्यक्ष खरेदी खूपच मंदावली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
हंगामी व्यवसाय करणाऱ्यांना तोटा:
वसई विरारमधील बाजारपेठांमध्ये कपड्याची दुकाने असणारे तसेच बॅगा, शाळापयोगी वस्तूंची विक्री करणारे काही विक्रेते पावसाळ्यात छत्री आणि रेनकोट विकतात. पण, यावर्षी खरेदीदारांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे तोटा सहन करावा लागेल असे वाटत आहे, अशी प्रतिक्रिया विक्रेते रमेश चौरसिया यांनी दिली.
