वसई: पावसाळ्याच्या दिवसांत निर्माण होणाऱ्या गंभीर वाहतूक समस्या आणि वाढते अपघात यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या वतीने एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वाहतूक नियोजन आणि सुरक्षेसंबंधी विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

वसई विरार मिरा भाईंदर शहरात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले होते. यामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्ग, घोडबंदर रस्ता, तसेच दोन्ही शहरातील अंतर्गत वाहतुकीचे रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. तसेच काही भागात भीषण वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना बराच वेळ वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले होते.

त्यामुळे खबरदारी म्हणून पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच आयुक्तालयाच्या संवाद हॉलमध्ये विशेष बैठक पार पडली. या महत्त्वपूर्ण बैठकीला भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, प्रादेशिक परिवहन विभाग, मिरा-भाईंदर महानगरपालिका, वसई-विरार महानगरपालिका तसेच पोलीस वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पावसाळ्यात रस्त्यावरील खड्डे, पाणी साचणे आणि इतर तांत्रिक कारणांमुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा होतो. या पार्श्वभूमीवर, सर्व संबंधित यंत्रणांमध्ये योग्य समन्वय साधून पावसाळ्यात महामार्ग आणि शहरातील अंतर्गत रस्त्यांवर वाहनांची गती मंदावणार नाही आणि कोंडी होणार नाही यासाठी कृती आराखडा तयार करणे, रस्त्यांवर पाणी साचणाऱ्या जागांचा शोध घेऊन पाण्याचा निचरा करणे, खड्डे तातडीने भरणे आणि रस्त्यावरील बंद पडलेली वाहने तात्काळ बाजूला करणे, अपघातप्रवण क्षेत्रांमध्ये आवश्यक ते बदल करणे, दिशादर्शक फलक लावणे आणि सुरक्षेच्या उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करणे अशा विविध सूचना देण्यात आल्या.

बैठकी दरम्यान अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे यांनी उपस्थित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना संबोधित केले. पावसाळ्याच्या काळात नागरिकांना वाहतुकीचा त्रास होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन आणि परस्परांशी समन्वय ठेवून काम करण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच, अपघात रोखण्यासाठी तातडीने प्रत्यक्ष उपाययोजना राबविण्याबाबत त्यांनी योग्य ते मार्गदर्शन केले.