वसई: वसई विरार शहरात डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिक हैराण झाले आहे. शहरातील नाल्यात साचलेला गाळ, उघडी गटारं, जागोजागी टाकण्यात येणारा कचरा आणि जलाशयांमध्ये वाढलेली जलपर्णी ही डासांची उत्पत्ती केंद्र ठरू लागली आहेत. तर यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून दरवर्षी धुरीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च केले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र त्याचा परिणाम होताना दिसत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

वसई, विरार आणि नालासोपारा शहरातील खाडी किनारे, तलाव आणि नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली आहे. विशेषतः विरारमधील मारंबळपाडा, ग्लोबल सिटी, बोळिंज आणि वसईतील एव्हरशाईन सिटी, वसंत नगरी यांसारख्या दाट वस्तीच्या भागात डासांचा त्रास असह्य झाला आहे. पाण्यात वाढलेल्या जलपर्णीमुळे पाणी एकाच ठिकाणी तुंबून राहते. यामुळे पाणी दूषित होते आणि अशा दूषित पाण्यात डास तयार होतात.

तसेच शहरात जलवाहिन्या, गटारबांधणी तसेच रस्ते दुरुस्तीच्या कामांसाठी खोदलेली गटारे आजही उघडीच आहेत. या उघड्या गटारांमध्ये कचरा अडकून पाणी साचत आहे. या साचलेल्या घाण पाण्यातून येणारी दुर्गंधी आणि त्यातूनच होणारी डासांची उत्पत्ती यामुळे नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. या उघड्या गटारांमुळे नागरिकांना दिवसा माश्या आणि रात्री डास अशा दुहेरी त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

तर सातिवली, भोयदापाडा या भागातील रहिवासी कचराभूमीत साचलेल्या कचऱ्यातून निर्माण होणाऱ्या डासांमुळे हैराण झाले आहेत. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू नसल्याचे दिवसेंदिवस या भागातील कचऱ्याचे ढीग वाढत आहेत. तर त्यामुळे डासांची पैदासही वाढत चालली आहे.

महापालिका कीटकनाशके, फवारणीसाठी लागणारे मनुष्यबळ आणि इंधनावर दरमहा कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र, त्यानंतरही शहरातील डासांचा प्रश्न मार्गी लागला नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. तसेच डासांच्या वाढत्या संख्येमुळे शहरात डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियासारख्या आजारांचे रुग्ण वाढत असून ज्येष्ठ आणि लहान मुलांना याचा सर्वाधिक धोका असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.