वसई: वसई विरार शहरात छुप्या मार्गाने वीज चोरी करण्याचे प्रकार सुरूच आहेत. यंदाच्या वर्षात महावितरणने ५७७ इतक्या वीजचोरीच्या घटना उघड केल्या आहेत. यात जवळपास १० लाख ५९ हजार युनिटची वीज चोरी झाली आहे.

महावितरणच्या वसई मंडळाच्या अंतर्गत वसई विरार व वाडा विभागात वीज पुरवठा केला जातो. शहरात घरगुती, व्यवसायिक, शासकीय, औद्योगिक असे १० लाख ७० हजार वीज ग्राहक आहेत. मागील काही वर्षात वाढत्या नागरीकरणामुळे वीज ग्राहकांची संख्या वाढत आहे तर दुसरीकडे काही ठिकाणी छुप्या मार्गाने वीज चोरीचे प्रमाण ही वाढू लागले आहे.

वीज मीटरच्या वाहिन्यांमध्ये फेरफार करणे, आकडे टाकणे, मुख्य वीज जोडणीच्या सर्व्हिस वाहिनीला टॅपिंग करणे अशा विविध प्रकारच्या मार्गाने वीज चोरी केली जात असते. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह महावितरणला बसून लागला आहे. या वीज चोरीमुळे महावितरणला आर्थिक तोटा होऊ लागला आहे.

यासाठी वीज चोरांना आवर घालण्यासाठी महावितरणने भरारी पथके, विशेष पथके नियुक्त केली आहेत. त्यांच्याद्वारे धडक कारवाई सुरू आहे. यंदाच्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षात महावितरणच्या पथकाने ५७७ इतक्या वीज चोरीच्या घटना उघड केल्या आहेत. या वीजचोरांनी जवळपास १० लाख ५९ हजार २४ इतके युनिटची सुमारे २ कोटी ८४ लाख ६७ हजार रुपयांची वीज चोरी केली आहे. त्यापैकी ८० लाख रुपये वसूल करण्यात आल्याचे महावितरणने सांगितले आहे. तर विविध पोलीस ठाण्यात ८ गुन्हे दाखल केले आहेत असेही महावितरणच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

वीज चोरी नियंत्रणात

मागील वर्षी वीज चोरीचे प्रमाण अधिक होते. २०२४-२५ मध्ये २ हजार ४०४ इतक्या वीज चोरीच्या घटना उघड केल्या होत्या. २०२५-२०२६ या वर्षात तपासणी दरम्यान आतापर्यंत ५७७ इतक्या वीज चोरीच्या घटना घडल्या आहेत. सातत्याने कारवाया सुरू असल्याने मागील वर्षीच्या तुलनेत १ हजार ८२७ ने प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत वीज चोरी नियंत्रणात असल्याचा दावा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

वीजचोरी साहजिक आर्थिक तोटा महावितरणला होत असतो. असे प्रकार टाळण्यासाठी सातत्याने शहरात तपासणी मोहिमा राबविल्या जात आहेत. तसेच सदोष मीटर बदलण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. -संजय खंडारे, अधीक्षक अभियंता महावितरण विभाग वसई.

वीज चोरी रोखणे यासाठी आमचे प्राधान्य आहे. यासाठी प्रत्येक उपविभागात पथके कार्यरत आहेत. वीज चोरी करीत आहेत त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल होत आहेत. -शैलेश जैन, कार्यकारी अभियंता महावितरण

स्मार्ट मीटरमुळे लक्ष ठेवणे सुलभ

स्मार्ट मीटरमुळे छुप्या मार्गाने होणारी चोरी नियंत्रणात आणता येणार असल्याचा दावा महावितरणने केला आहे. नुकताच लावण्यात आलेल्या स्मार्ट मीटरला चुंबक लावून व त्यात फेरफार करून वीज चोरी करण्याचा प्रकार केला होता. त्यांची माहिती थेट आमच्या सिस्टमला कळत असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे. मीटर फेरफार करणे, विद्युत प्रवाह (करंट) समतोल नसणे, कमी पॉवर फॅक्टर असणे, न्यूट्रल डिस्टर्बन्स, करंट किंवा व्होल्टेज कमीजास्त असणे, विद्युत प्रवाह नसणे, सिटी व पीटी बायपास करणे अशी सर्व माहिती ऑनलाइन स्वरूपात समोर येत आहे. या वीज चोरी वर लक्ष ठेवण्यासाठी पथके ही नियुक्त केली आहेत महावितरणने सांगितले आहे.