(मुंबई महानगर क्षेत्रातील इतर महापालिकांप्रमाणे वसई विरार महापालिकेकडूनही शहरात बससेवा सुरू करण्यात आली. एसटी बसमुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी व शहरांतर्गत प्रवास सुखकर करण्याच्या उद्देशाने ही बससेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, बसच्या अपुऱ्या फेऱ्या, वारंवार होणारे कर्मचाऱ्यांचे संप, कोलमडलेले वेळापत्रक, गाड्यांमध्ये वरचेवर होणारा बिघाड यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेली ही बससेवा आता अत्यंत गैरसोयीची ठरू लागली आहे. )

वसई-विरार शहराचे नागरिकरण झपाट्याने वाढू लागले आहे. दररोज कामानिमित्त, शिक्षणासाठी किंवा व्यवसायासाठी घराबाहेर पडणाऱ्या लाखो नागरिकांसाठी वसई-विरार महापालिकेची सार्वजनिक परिवहन सेवा हा सर्वात मोठा आणि प्रमुख आधार मानली जाते. ज्याप्रमाणे पश्चिम रेल्वे ही मुंबईकरांसाठी जीवनवाहिनी आहे, त्याचप्रमाणे वसई-विरार शहराच्या अंतर्गत प्रवासाच्या दृष्टीने ही बससेवा अत्यंत महत्त्वाची ठरते. परंतु, मागील १४ वर्षांपासून सुरू असलेल्या या परिवहन सेवेचा आज पूर्णपणे बोजवारा उडालेला पाहायला मिळत आहे. इतक्या वर्षांच्या दीर्घ कालावधीत परिवहन सेवेत ज्या मूलभूत आणि अपेक्षित सुधारणा व्हायला हव्या होत्या, त्या न झाल्याने विविध कारणांमुळे महापालिकेची ही सेवा वादाच्या भोवऱ्यात अडकू लागली आहे.

सद्यस्थितीत वसई-विरार महापालिकेच्या परिवहन विभागाकडे एकूण ११४ बसेस उपलब्ध असून त्यामध्ये ४० पर्यावरणपूरक ई-बसेसचा समावेश आहे. या बसेसच्या माध्यमातून शहरातील सुमारे ३६ विविध मार्गांवर दररोज तब्बल २ हजार २०० फेऱ्या मारल्या जातात. या बससेवेचा लाभ दररोज ६५ ते ७० हजार प्रवासी घेतात. सर्वसामान्य नोकरदार वर्ग, ज्येष्ठ नागरिक आणि शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने या सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून आहेत. त्यातच सुमारे वर्षभरापूर्वी राज्य शासनाच्या धोरणानुसार महिलांसाठी तिकिटाच्या दरात ५० टक्के सवलत लागू करण्यात आली. या सवलतीमुळे महिला प्रवाशांचा ओढा बसप्रवासाकडे कमालीचा वाढला आहे. वाढत्या महागाईच्या काळात, तसेच पेट्रोल-डिझेलचे भडकलेले दर आणि रिक्षाचालकांचे अनियंत्रित भाडे यामुळे पिचलेल्या सर्वसामान्यांसाठी महापालिकेची बस हाच एकमेव परवडणारा आणि सोयीचा पर्याय उरला आहे. मात्र, प्रवाशांची ही वाढती संख्या विचारात घेता पालिकेची सद्यस्थितीतील बससेवा अत्यंत
अपुरी आहे.

अलीकडच्या काळातील घटनाक्रम पाहिला तर महापालिकेची परिवहन सेवा पूर्णपणे ढासळल्याचे उघड झाले आहे. या कोलमडलेल्या व्यवस्थेमागील सर्वात मोठे कारण म्हणजे महापालिका प्रशासन आणि कंत्राटदार यांच्यातील समन्वयाचा तीव्र अभाव. कंत्राटदार आणि पालिका यांच्यातील अंतर्गत वादाचा फटका नेहमीच सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागतो. कंत्राटदार वेळेवर देयक मिळत नसल्याची तक्रार करतो, तर दुसरीकडे पालिका प्रशासन वेळेवर निधी वर्ग करत असल्याचा दावा करते. या प्रशासकीय गोंधळात कर्मचाऱ्यांचे वेतन रखडते आणि त्याचे रूपांतर संपात होते. गणेशोत्सवासारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि आनंदाच्या सणादरम्यान कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ व प्रलंबित मागण्यांसाठी अचानक संप पुकारला होता. या संपामुळे सणासुदीच्या काळात एकही बस रस्त्यावर न धावल्याने याचा फटका प्रवाशांना बसला.

संपाचे प्रकरण एक-दोन दिवसांत सामंजस्याने सुटू शकले असते, त्यावर तोडगा काढण्यासाठी पालिका प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी, ठेकेदार आणि कर्मचारी संघटना यांच्यात मॅरेथॉन बैठकांचे सत्र चालले. तब्बल ५ दिवस हा संप लांबल्यामुळे नागरिकांना अतोनात हाल सहन करावे लागले आणि त्यांना वेठीस धरले गेले.

प्रशासकीय दुर्लक्ष आणि कंत्राटदाराचा बेफिकिरीचा कारभार यामुळे प्रवासी सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रवाशांना स्वस्त प्रवासासोबतच सुरक्षित प्रवास देणे हे पालिकेचे प्राथमिक कर्तव्य आहे, परंतु पालिकेला याचा पार विसर पडल्याचे चित्र आहे. अनेक वर्षांपासून वापरात असलेल्या महापालिकेच्या बसेस आता अत्यंत जुन्या आणि दयनीय अवस्थेत पोहोचल्या आहेत. या खटारा बसेस बदलण्याऐवजी परिवहन विभाग अजूनही जबरदस्तीने त्या रस्त्यावर उतरवत आहे. तसेच, अनेक बसचालक अत्यंत बेफिकीरपणे आणि निष्काळजीपणे गाड्या चालवताना आढळतात, ज्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. याशिवाय, मागणी जास्त आणि बसेस कमी असल्याने क्षमतेपेक्षा कितीतरी पट अधिक प्रवासी बसमध्ये कोंबले जातात. यामुळे बस एकाच बाजूला धोकादायकपणे झुकल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. अशा ओव्हरलोड झालेल्या बसेस रस्त्यात कलंडून मोठा जीवघेणा अपघात होण्याची तीव्र भीती नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.

परिवहन सेवेच्या या वाईट स्थितीला शहरातील रस्त्यांची दुरवस्थाही तितकीच कारणीभूत ठरत आहे. रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेल्या अथांग खड्ड्यांमुळे चालकांना वाट काढताना मोठी कसरत करावी लागते. खड्ड्यांच्या मारामुळे बसेस सतत नादुरुस्त होत असतात. तेव्हा ही त्या मार्गावरील सेवा विस्कळीत होत असते. पावसाळ्यात तर किंचितसा पाऊस झाला तरी अनेक मार्गांवरील बससेवा पूर्णपणे ठप्प केली जाते, तर काही ठिकाणी खड्ड्यांचे कारण पुढे करत बस पाठवणेच बंद केले जाते.

मग अशा स्थितीत सर्व सामान्य नागरिकांनी प्रवास करायचा तरी कसा असा प्रश्न निर्माण होत असतो. वारंवार बससेवा बंद पडल्यामुळे महिला, नोकरदार आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना नाईलाजाने महागड्या खाजगी गाड्यांचा किंवा रिक्षांचा आसरा घ्यावा लागतो, त्यात त्यांचे आर्थिक गणित बिघडते. त्यातही काही वेळा रिक्षा चालक भाडे नाकारतात अशा वेळी मात्र प्रवाशांची दुहेरी कोंडीचा सामना करावा लागतो. परिवहन सेवा ही शहराची खरी जीवनवाहिनी असल्याने त्यावर प्रशासनाचा पूर्ण आणि कडक अंकुश असणे आवश्यक आहे. केवळ कागदावर योजना आखण्यापेक्षा पालिकेने प्रत्यक्ष धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे बनले आहे.

पालिकेच्या बसपेक्षा एसटी बरी!

वसई विरार महापालिकेची परिवहन सेवा सुरू होण्यापूर्वी एसटी महामंडळाकडून शहरांतर्गत बससेवा पुरवली जायची. सकाळी ६ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत या बसेस चालायच्या. त्यामुळे प्रवाशांना आणि खासकरून नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळायचा. पालिकेची परिवहन सेवा सुरू झाल्यामुळे हा प्रवास अधिक सोयीचा होईल असे वाटले होते. मात्र, कोलमडलेले वेळापत्रक, वेळेचा चुकलेला अंदाज आणि अनेकदा मागणी करूनही सुरू काही ठिकाणी सुरू न होणारी बसेसेवा यामुळे पालिकेच्या बसपेक्षा एसटीच बरी, असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर ओढवली आहे.