वसई:- वसई-विरार शहर महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराची मालिका थांबताना दिसत नाही. प्रभाग समिती जी कार्यालयातील घरपट्टी आणि वृक्ष प्राधिकरण विभागाचा वर्ग-३ चा लिपीक दिलीप लक्ष्मण लोखंडे (५२) याला मंगळवारी सायंकाळी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. झाडे तोडणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी या लाचखोर लिपीकाने तक्रारदाराकडे लाच मागितली होती.या कारवाईमुळे वसई-विरार महापालिकेच्या वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
तक्रारदार यांना एका जागा मालकाने अधिकारपत्र दिले आहे. या जागेवर अन्य एका इसमाने अवैधरित्या कब्जा करून तेथील झाडे विनापरवाना तोडली होती. याप्रकरणी संबंधित इसमाला नोटीस बजावून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी प्रभाग समिती जी मधील सातीवली विभागीय कार्यालयातील लिपीक दिलीप लोखंडे याने तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची लाच मागितली होती.
तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी २७ मे रोजी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या अनुषंगाने २८ मे रोजी एसीबीच्या पथकाने सातीवली कार्यालयात पडताळणी केली असता, लोखंडे याने १० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
कार्यालयातच रचला सापळा
लाचेची मागणी सिद्ध झाल्यानंतर, मंगळवार २ जून सायंकाळी सातीवली (वालीव) विभागीय कार्यालयात एसीबीच्या पथकाने सापळा रचला. सायंकाळी ५ वाजून २० मिनिटांच्या सुमारास तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना दिलीप लोखंडे याला पथकाने रंगेहात पकडले.लोखंडे याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या विरुद्ध वालीव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
ही कारवाई कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ठाणे परिक्षेत्र पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे व भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष नावलगी व त्यांच्या पथकाने केली आहे.अवघ्या सव्वा महिन्यांच्या कालावधीत ठाणे -पालघर एसीबी विभागाने केलेली चौथी कारवाई आहे.
