वसई: वसई-विरार महापालिकेच्या आयुक्तांच्या निवासासाठी बनविण्यात आलेल्या या आयुक्त निवासामध्ये महापालिकेचे विद्यमान आयुक्त पृथ्वीराज बी.पी. वास्तव्य करीत नसल्यामुळे आयुक्त निवास विनावापर पडून आहे. या इमारतीच्या देखभाल-दुरुस्तीवर आतापर्यंत करोडो रुपये खर्च झालेले आहेत. त्यामुळे या इमारतीचा प्रत्यक्ष वापर करावा, अशी मागणी समोर येत आहे.

महापालिका प्रशासनाकडून आयुक्तांना राहण्यासाठी निवास उपलब्ध करून दिला जातो. शासकीय खर्चातून त्या इमारतीची देखभाल केली जाते. वसई विरार शहरातही महापालिकेच्या प्रभाग समिती ‘एच’ कार्यक्षेत्रात पंडित दीनदयाळ नगर येथे आयुक्त निवास आहे. सदर आयुक्त निवासाच्या देखभाल दुरुस्तीवर आतापर्यंत करोडो रुपये खर्च झालेले आहेत. या आयुक्त निवासात तत्कालीन आयुक्त डी. गंगाथरन, अनिलकुमार पवार यांनी आपापल्या कार्यकाळात वास्तव्य केले होते.

मात्र, महापालिकेचे विद्यमान आयुक्त पृथ्वीराज बी.पी. या निवासात वास्तव्य करीत नसल्यामुळे आयुक्त निवास मागील दीड ते दोन वर्षांपासून विनावापर पडून आहे. त्यामुळे या निवासाचा योग्य तो वापर व्हावा व देखभाल-दुरुस्तीवर केलेला खर्च वाया जाऊ नये म्हणून निवासस्थानाचा वापर होणे आवश्यक आहे, असे मत भाजपचे नगरसेवक महेश सरवणकर यांनी व्यक्त केले आहे. तसेच या मागणीसाठी त्यांनी आयुक्तांकडे निवेदनही सादर केले आहे.