वसई: वसई-विरार महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून गेल्या आठ महिन्यांपासून धुरा सांभाळणारे मनोजकुमार सूर्यवंशी ३१ मार्च रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. प्रशासकीय राजवटीच्या काळात नियुक्ती झालेले सूर्यवंशी यांनी आपल्या अल्पशा कार्यकाळात प्रलंबित निवडणूक प्रक्रिया आणि शहराच्या सांस्कृतिक ओळखीला उजाळा देणारे महत्त्वाचे निर्णय घेतल्याने त्यांची कारकीर्द लक्षणीय ठरली आहे.
वसई विरार महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू असताना जुलै-२०२५ मध्ये मनोज कुमार सूर्यवंशी यांची नियुक्ती महापालिका आयुक्त पदी करण्यात आली होती. त्यांच्या नियुक्तीनंतर त्यांनी शहरातील प्रशासनाची विस्कटलेली घडी नीट बसवण्यासाठी विविध महत्वाचे निर्णय घेतले. यात शहरातील अनधिकृत बांधकाम, पाणीप्रश्न, रस्त्यांची दुरावस्था अशा विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांनी पावले उचलली.
तसेच त्यांच्या नियुक्तीनंतर काही काळातच महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. प्रभाग रचना, मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण आणि प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे व शांततेत पार पाडण्याचे मोठे आव्हान त्यांनी पेलले. निवडणुकीनंतर नवीन सभागृह अस्तित्वात येईपर्यंतचा दुवा म्हणून त्यांनी प्रभावी काम केले.
शहराच्या भौतिक विकासासोबतच वसईची सांस्कृतिक ओळख जपण्यावर सूर्यवंशी यांनी विशेष भर दिला. यंदाच्या अर्थसंकल्पात त्यांनी मांडलेल्या ‘संविधान पार्क’, ‘रांगोळीचे गाव’, ‘केळीचे गाव’, ‘मच्छीमारांचे गाव’, ‘फुलांचे गाव’ आणि ‘बर्ड पार्क’ यांसारख्या संकल्पनांनी वसईच्या पर्यटनाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला.
सोमवारी सायंकाळी महापालिका मुख्यालयात त्यांचा निरोप समारंभ पार पडला. यावेळी बोलताना आयुक्तांनी आपल्या कारकिर्दीतील विविध रंजक अनुभवांचे कथन केले. विशेषतः ‘पेशवेकालीन प्रशासनिक मराठी’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचा अनुभव सांगताना त्यांनी प्रशासकीय भाषेतील बारकावे उलगडून दाखवले. यावेळी महापौर अजीव पाटील, उपमहापौर मार्शल लोपीस, माजी महापौर नारायण मानकर, सभागृह नेते प्रफुल्ल साने, स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी, विरोधी पक्ष नेते मनोज पाटील, गटनेते अशोक शेळके, आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांची पत्नी व मुलगी आदी मान्यवर व्यसपीठावर उपस्थित होते.
