वसई: वसई-विरार शहर महानगरपालिकेतील प्रशासकीय अनागोंदी, बोकाळलेला भ्रष्टाचार आणि शहराचे झालेले बकालीकरण रोखण्यासाठी महापालिका आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे वसई रोड मंडळ अध्यक्ष तथा माजी नगरसेवक महेश सरवणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
गेल्या पाच वर्षांपासून वसई विरार महापालिका प्रशासकीय राजवटीखाली होती. तर यावर्षी पार पडलेल्या निवडणुकीनंतर बहुजन विकास आघाडीने पालिकेत पुन्हा एकदा सत्ता स्थापन केली आहे. तर भाजप पक्षानेही कट्टर विरोधक म्हणून पालिकेत आपले स्थान निश्चित केले आहे. पण, प्रशासकीय राजवटीत महापालिकेत विविध प्रकरणे उघडकीस आली आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाच्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी मार्च अखेरीस आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी सेवानिवृत्त होत असल्यामुळे त्यांच्या जागी वसई-विरार महापालिकेचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढेंची नियक्ती करण्याची मागणी जोर धरत आहे.
वसई-विरार महापालिकेत प्रशासकीय राजवटीत मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार व भ्रष्टाचार पाहावयास मिळाला. तत्कालीन आयुक्त अनिलकुमार पवार यांनी प्रशासकीय राजवटीत अनावश्यक कामे काढून वसई-विरार महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट निर्माण केला. त्यामुळे वसई-विरार महापालिकेची आर्थिक स्थितीदेखील डबघाईला आलेली आहे. प्रशासकीय राजवटीत वसई-विरार महापालिका प्रशासनातील अधिकारी व कर्मचारीदेखील बेजबाबदार व मनमानीपणे वागत होते. बेकायदा बांधकामे, अतिक्रमण, आरक्षित भूखंडावरील अतिक्रमणे, बिघडलेली आरोग्य व्यवस्था, रखडलेले सांडपाणी प्रकल्प, होल्डिंग पॉंड, रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी, बिघडलेली परिवहन व्यवस्था आदींमुळे वसई-विरार महापालिका क्षेत्राचे बकालीकरण झालेले आहे. महापालिका क्षेत्रात भ्रष्टाचार बोकाळला आहे. त्याचा फटका शहराच्या सर्वांगीण विकासाला बसला आहे.
बेशिस्त महापालिका प्रशासनाला शिस्त लावण्यासाठी, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी तथा वसई-विरार शहरात सर्वांगीण विकासासाठी कर्तव्यदक्ष व कठोर आयएएस अधिकार्याची वसई-विरार महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती होणे आवश्यक आहे. तुकाराम मुंढे यांच्यासारखा कर्तव्यदक्ष व कठोर निर्णयक्षमता असलेल्या अधिकार्याची वसई-विरार महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यास वसई-विरार शहराचा सुनियोजित विकास करणे सोयीचे होईल, असे भाजपचे नगरसेवक महेश सरवणकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
