वसई:- वसई विरार महापालिकेचा घनकचरा विल्हेवाट प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली असतानाच आता शहराच्या स्वच्छतेसाठी पाच वर्षासाठी काढण्यात आलेले ९५७ कोटींची निविदा ही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सोमवारी झालेल्या महासभेत या निविदेची सखोल चौकशी करण्यात यावी व याबाबत अभिप्राय घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
महापालिकेच्या घनकचरा विभागातर्फे दैनंदिन रस्ते व सार्वजनिक ठिकाणांची सफाई, गटार चेंबर सफाई करणे, घरोघरी जाऊन कचरा उचलणे आणि तो कचराभूमीवर नेऊन टाकणे अशा विविध कामांसाठी ठेका दिला जातो.यापूर्वी सदर कामासाठी ठेका दिलेल्या ठेकेदारांची मुदत गेल्या वर्षीच संपली
होती. त्यामुळे तब्बल तीन वेळा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. तर तिसऱ्या वेळी प्रभागनिहाय निविदा काढून २०२५- २६ ते २०३०-३१ या पाच वर्षांसाठी मे.अमृत एंटरप्रायजेस, आर एन बी इन्फ्रा प्रा. लि आणि क्रिस्टल इंटरग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेड या तीन ठेकेदारांना ९५७.६४ कोटींचे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र देण्यात आलेले कंत्राट हे अतिशय घाई घाईने दिले असल्याचा व शहरातील दैनंदिन स्वच्छता ही योग्य रित्या होत नसल्याचे आरोप करण्यात आले होते. त्यामुळे या निविदा प्रक्रियेची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती.
नागरिकांच्या वाढत्या तक्रारी नंतर सोमवारी पार पडलेल्या महासभेत ९५७.६४ कोटींच्या संशयास्पद निविदा प्रक्रियेचा मुद्दा चर्चेसाठी ठेवण्यात आला होता. महासभेत झालेल्या चर्चेदरम्यान विरोधकांनी प्रशासनाच्या कारभारावर आणि निविदेतील अटी-शर्तींवर थेट बोट ठेवले. शहरात दररोज गोळा होणाऱ्या कचऱ्याचे योग्य वजन न करता केवळ अंदाजावर कारभार सुरू असल्याचा आरोप सदस्यांनी केला. तसेच, या निविदेत कंत्राटदाराकडून लागणाऱ्या कामगारांचा स्पष्ट उल्लेख नसून, ठराविक क्षमतेच्या वाहनांची अट घालून विशिष्ट कंत्राटदारालाच फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप भाजपचे विरोधी पक्ष नेते मनोज पाटील यांनी केला आहे.
स्वच्छतेबाबत नगरसेवकांच्या तक्रारी
महापालिका स्वच्छतेवर आणि कचरा व्यवस्थापनावर वर्षाला तब्बल ४३० कोटींहून अधिक खर्च करते, तरीही अनेक प्रभागांत ओला व सुका कचरा नियमित उचलला जात नाही. २ ते ३ दिवस कचरा तसाच पडून राहत असल्याने दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिले. काम न करणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याऐवजी प्रशासन त्यांना केवळ नोटिसा देऊन सोडून देते आणि देयके मंजूर केली जातात असा ही आरोप नगरसेवकांनी केला.
अभिप्राय घेऊन कारवाई होणार
संशयास्पद असलेल्या घनकचरा निविदा प्रकरणाची दखल घेत महापौर अजीव पाटील यांनी सर्व नगरसेवकांना आपल्या प्रभागातील स्वच्छतेबाबतचा व ठेकेदाराच्या कामाबद्दल अभिप्राय देण्यात यावा अशा सूचना त्यांनी नगरसेवकांना केल्या आहेत. तसेच जी निविदा प्रक्रिया राबविली त्याच्या अटी शर्ती काय होत्या याचीही सविस्तर माहिती प्रशासनाकडून घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. या विषयावर पुढील सर्वसाधारण सभेत सविस्तर आणि सखोल चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे निर्देश महापौरांनी प्रशासनाला दिले.
