वसई:- ​वसई-विरार शहरातील मुख्य रस्त्यांच्या कडेला वर्षानुवर्षे धूळखात पडलेल्या बेवारस आणि भंगार वाहनांविरोधात महापालिकेने अखेर कारवाईचा बडगा उगारला आहे. अशा वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्यासोबतच गुन्हेगारी प्रवृत्तींना खतपाणी मिळत असल्याच्या तक्रारीं महापालिकेकडे येत होत्या. अखेर अशा बेवारस वाहनांवर जप्तीच्या नोटीसा लावण्यास सुरुवात केली आहे.

वसई विरार शहरातील वाढत्या नागरीकरणासह वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. अरुंद रस्ते आणि बेसुमार वाहने यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडी, अपघात अशा विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. पण, शहरातील अंतर्गत आणि वाहतुकीच्या मुख्य रस्त्यांच्या कडेला उभ्या असणाऱ्या बेवारस वाहनांमुळे या समस्येत अधिकच भर पडत आहे. वसई विरार शहरात वर्षानुवर्षे रस्त्यावर उभी असलेली बेवारस वाहने आणि भंगार साहित्य यामुळे शहराचे विद्रुपीकरण होऊ लागले आहे. तसेच रात्रीच्या वेळी ही वाहने दिसून येत नसल्याने अपघातांचीही शक्यता निर्माण झाली आहे.

शहरात वर्षानुवर्षे वर्षे ही वाहने एकाच जागी उभी राहत असल्याने समस्या निर्माण होत आहेत. अशा वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असतो. याशिवाय रस्त्यावरून नागरिकांना ये-जा करणेही अडचणीचे ठरते. तसेच काही ठिकाणी वाहने ही तशीच पडून असल्याने अशा वाहनांत आजूबाजूच्या भागातील लहान मुले ही खेळण्यास जात असतात त्यामुळेही एखादी दुर्घटना होण्याची शक्यता असते.  काही वेळा या भंगार व बेवारस वाहनात गर्दुल्ले बसून गैरप्रकार करीत असतात. याबाबतच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता महापालिकेने  बेवारस वाहनांना जप्तीच्या नोटीसा लावण्यास सुरूवात केली आहे. प्रभाग निहाय ही कारवाई सुरू केली असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.

पहिल्या टप्प्यात संबंधित वाहनांवर नोटीस चिकटवून वाहनमालकांना ती हटवण्यासाठी ठराविक मुदत दिली आहे. या विहित मुदतीत वाहन न हटवल्यास महापालिका ही वाहने जप्त करून डंपिंग ग्राऊंड किंवा पालिकेच्या आरक्षित जागेत हलवणार आहे. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या भंगार वाहनांचा लिलाव करण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.