वसई:- आदिवासी समाजाला त्यांच्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवल्याच्या निषेधार्थ सोमवारी आदिवासी बांधवांनी महापालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला होता.या मोर्चात मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले होते. वसई विरार पूर्व व पश्चिम पट्ट्यात आदिवासी बांधव गेल्या अनेक वर्षांपासून राहत आहेत.
मात्र त्यांना प्राथमिक सोयीसुविधा पुरविण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. ३० ऑक्टोबर २०२५ रोजी काढलेल्या मोर्च्यावेळी झालेल्या चर्चेनंतर प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
आदिवासी एकता परिषद आणि भूमी सेना संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी वसई-विरार महापालिकेवर पुन्हा एकदा मोर्चा काढत पालिकेच्या मुख्यालयाच्या समोर ठिय्या आंदोलन केले. यापूर्वी आम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं की आमची कामं लवकरात लवकर होतील. पण आजपर्यंत कोणतंही काम झालेलं नाही.
ज्या अधिकाऱ्यांनी आमची फसवणूक केली आहे, त्यांच्यावर कारवाई होत नाही आणि जोपर्यंत आयुक्त आमच्या मागण्या मान्य करत नाहीत, तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. भले आम्हाला इथे ८ दिवस बसावे लागले तरी चालेल असे आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष दत्ता सांबरे यांनी सांगितले आहे. जो पर्यँत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असे आंदोलन कर्त्यांनी सांगितले आहे.
मोर्चातील प्रमुख मागण्या:
- वसई-विरारमधील पारंपरिक आदिवासी पाड्यांची नोंद तातडीने नगररचनेच्या नकाशावर करणे.
- ’सर्वांसाठी घरे योजना २०२२’ नुसार आदिवासींची घरे आहेत त्याच ठिकाणी नियमाकुल करून देणे.
- जिल्हा परिषद शाळांचे नूतनीकरण करून मोफत शिक्षणाची व्यवस्था करणे आणि आरोग्य केंद्रे उभारणे.
- ’हर घर जल’ मिशन अंतर्गत प्रत्येक पाड्याला पिण्याचे पाणी देणे आणि प्रलंबित घरपट्ट्यांचे प्रश्न मार्गी लावणे.
- गास, सनसिटी रोड येथील उद्यानात क्रांतीवीर बिरसा मुंडा व राघोजी भांगरे यांचे स्मारक उभारणे आणि ९ ऑगस्ट ‘विश्व आदिवासी दिन’ साजरा करण्यासाठी निधी देणे.
- गिरीज टोकपाडा आणि इतर भागातील आदिवासींच्या वहिवाटीच्या रस्त्यांवरील अनधिकृत बांधकामे त्वरित हटवणे.
