वसई: वांद्रे तसेच मुंबईतील इतर रेल्वे स्थानकांलगत सुरू असलेल्या तोडक कारवाईमुळे बेघर झालेल्या नागरिकांनी वसई विरार शहरातील बेकायदा बांधकामांमध्ये आश्रय घेऊ नये, यासाठी महापालिकेकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. अनधिकृत बांधकामांवरील कारवाईसह नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

वांद्रे पूर्वेतील गरीबनगर या रेल्वे स्थानकानजिकच्या बांधकामावर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पश्चिम रेल्वे प्रशासनाने ५,३०० चौरस मीटर जागेवरील ५०० पैकी ४०० अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली आहे. १९ मे ते २२ मे या कालावधीत करण्यात आलेल्या या कारवाईत अंदाजे दोन हजार ते अडीच हजार रहिवासी बेघर झाले आहेत. तर दुसरीकडे मुंबईजवळ आणि स्वस्त दरात मिळणाऱ्या घरांच्या शोधात असलेले हे विस्थापितांचे लोंढे वसई विरार शहरात येऊन कायमचे स्थिरावतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे शहरातील बेकायदा बांधकामांना पुन्हा एकदा चालना मिळू शकते, अशी भितीही नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.

या चर्चा सुरू असताना वसई विरार महापालिकेकडूनही अनधिकृत बांधकामांना रोखण्यासाठी तसेच स्थलांतरित नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी विशेष काळजी घेतली जात असल्याची माहिती महापौर अजीव पाटील यांनी दिली आहे. वसई विरार शहरात सध्या अस्तित्वात असणाऱ्या बेकायदा बांधकामांसमोर सूचक पाट्या लावण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच शहरात उभ्या राहणाऱ्या अनधिकृत बांधकामावर देखील सातत्याने कारवाई केली जात आहे, असे महापौर पाटील यांनी सांगितले.

तसेच कमी दरात घर मिळवण्यासारख्या फसव्या जाहिरातींवर विश्वास नागरिकांनी ठेवू नये. तसेच अधिकृत सांगून अनधिकृत घरे विकणाऱ्यांपासून सावध रहावे, असे आव्हानही महापौरांनी केले आहे.

बोरीवली पॅटर्नची चर्चा

माजी महापौर राजीव पाटील यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, “दोन दशकांपूर्वी बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली होती. या कारवाईनंतर बेघर झालेले नागरिक नालासोपारा पूर्वेत आले आणि अनधिकृत बांधकाम बांधून स्थिरावले.” तसेच आता शहराकडे नवीन लोंढे सामावून घेण्याची क्षमता उरलेली नाही. त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी उपाययोजना व्हाव्यात, अशी भूमिकाही त्यांनी घेतली आहे.