वसई : वसई-विरार शहर महापालिकेच्या ढिसाळ आणि बेजबाबदार कारभाराचा फटका एका डंपर चालकाला बसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पालिकेच्या कंत्राटदाराने रस्त्यावरील खड्डा शास्त्रोक्त पद्धतीने न भरता केवळ वरवरची मलमपट्टी केल्यामुळे, पोकळ राहिलेल्या खड्ड्यात मातीने भरलेला डंपर रुतून थेट एका बाजूला पलटी झाला. या अपघातात डंपर चालक आणि क्लिनर हे दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.

​दोन महिन्यांपूर्वी वसईतील अंबाडी रोड येथील १०० फुटी रस्त्यावर पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटली होती. ही गळती रोखण्यासाठी महापालिकेने या ठिकाणी मोठा खड्डा करून पाईपलाईनची दुरुस्ती केली होती. मात्र, दुरुस्तीनंतर काही दिवस खड्डा उघडा राहिला होता.

सोमवारी कंत्राटदाराने या खड्ड्यात माती आणि डबर (खडी-दगड) टाकून बुजविला. याशिवाय मंगळवारी याठिकाणी डांबरीकरण करण्यात येणार होते. परंतु त्यापूर्वी सकाळी साडेसातच्या सुमारास या भरलेल्या खड्ड्यावरून मातीने भरलेला एक डंपर जात असताना डंपरचे एका बाजूचे चाक या खड्ड्यात पडताच तिथली जमीन पूर्णपणे खचून डंपर जागीच उलटून अपघात घडला आहे. यात चालक आणि क्लीनर किरकोळ जखमी झाले आहेत.

या घडलेल्या घटनेमुळे ​कंत्राटदार आणि पालिकेच्या इंजिनिअरिंग विभागाचा निष्काळजीपणा उघड झाला असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली कोणताही खड्डा बुजवताना त्यात माती आणि डबर टाकून तो योग्य पद्धतीने दाबणे (रॅमिंग किंवा रोलिंग करणे) आवश्यक असते, जेणेकरून जमीन घट्ट होते. मात्र, संबंधित कंत्राटदाराने केवळ वरवरचा दिखावा करत खड्ड्यात मातीची थातूरमातूर भरणी केली. त्यामुळे खड्डा आतून पूर्णपणे पोकळ राहिला असल्याचे सांगण्यात येत आहे.

एरव्ही या मार्गावर वर्दळ असते मात्र जेव्हा घटना घडली त्यावेळी कोणीही त्या ठिकाणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.