वसई:- ‘स्वच्छ भारत अभियान’ केवळ सरकारी फाईली आणि कागदावर मर्यादित न ठेवता, ते खऱ्या अर्थाने तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वसई-विरार शहर महापालिकेने आता कंबर कसली आहे. केवळ कचरा कुंड्या ठेवल्याने किंवा रस्ते झाडून शहर स्वच्छ होत नाही, तर त्यात लोकसहभाग असणे अनिवार्य आहे. हीच गरज ओळखून प्रशासनाने आता एका विशेष अनुभवी संस्थेची नियुक्ती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

वसई विरार शहरात महापालिकेकडून दैनंदिन स्वच्छता केली जाते. असे जरी असले तरी अनेक ठिकाणच्या भागात, रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे साम्राज्य दिसून येत आहे. विशेषतः काही नागरिक कचरा कुंडीत न टाकता मिळेल त्या जागी कचरा टाकून निघून जात आहेत. त्यातच रस्त्यावर पान किंवा तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकणे, खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर त्यांची पाकिटे रस्त्यावरच फेकणे असे प्रकार घडतात त्यामुळे शहरात अस्वच्छता पसरते. त्यामुळे नागरी आरोग्याला ही मोठा धोका निर्माण होतो.

शहर स्वच्छतेबाबत नागरिकांच्या मानसिकतेत बदल घडवून आणणे आवश्यक आहे. यासाठी जनजागृतीची मोहीम अधिक व्यापक करण्याचा निर्धार महापालिकेने केला असून यासाठी एका संस्थेची नियुक्ती करण्यात येणार आहे. ही संस्था विविध माध्यमांतून नागरिकांच्या थेट संपर्कात येणार आहे.यात प्रामुख्याने वर्दळीच्या ठिकाणी पथनाट्याद्वारे जनजागृती करणे, ​सोसायट्यांमध्ये बैठका घेऊन थेट रहिवाशांशी संवाद साधून कचरा व्यवस्थापनाची माहिती देणे, शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घराघरांत संदेश पोहोचवणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे असे उपक्रम या राबविले जाणार आहेत.

शासनाचा स्वच्छ भारत अभियान सारखा उपक्रम आहे. तो खऱ्या अर्थाने यशस्वी करण्यासाठी लोकसहभागाची गरज आहे.।जोपर्यंत सामान्य नागरिक यात स्वतःहून सहभागी होत नाही, तोपर्यंत शहराचा कायापालट होणे कठीण आहे. म्हणूनच आम्ही संस्थेच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबविली जाईल असे स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी यांनी सांगितले आहे.

​कचरा वर्गीकरणावर विशेष भर

​या मोहिमेअंतर्गत कचरा कुंडीतच टाकणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘ओला व सुका कचरा’ घरापासूनच वेगळा करणे यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. कचऱ्याचे वर्गीकरण झाल्यास पालिकेला त्याच्या विल्हेवाटीसाठी मोठी मदत होणार आहे.