वसई : शहरातील तलावांचे प्रदूषण रोखण्यासाठी वसई-विरार महापालिकेने शहरातील तलावांमध्ये विसर्जनासाठी बंदी घातली आहे. या तलावाऐवजी शहराबाहेर असलेल्या दगडखाणींच्या तलावांमध्ये विसर्जन केले जाणार आहे. त्यासाठी पालिकेने तीन दगडखाणींचे तलाव निश्चित केले असून गुरुवारी त्या तलावांची पाहणी करण्यात आली.  मात्र ऐनवेळी पालिकेने हा निर्णय घेतल्याने अनेक गणेशोत्सव मंडळांनी नाराजी व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गणेशोत्सव काळात विसर्जनादरम्यान शहरातील तलावांचे प्रदूषण होऊ नये यासाठी वसई-विरार महापालिकेने यंदा विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत शहरात ठिकठिकाणी कृत्रिम तलाव आणि फिरते कृत्रिम तलाव उभारले जाणार आहे. त्याशिवाय गणेशमूर्ती दान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पालिकेने शहरातील सर्व म्हणजे २० विसर्जन तलावांमध्ये विसर्जनासाठी बंदी घातली आहे. या ठिकाणी आलेल्या गणेशमूर्ती या शहराबाहेरील दगडखाणीच्या तलावात नेऊन विसर्जित केल्या जाणार आहेत. या संदर्भात प्रत्येक प्रभागात पालिका आणि पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव मंडळांच्या बैठकांचे आयोजन करून त्यांना या उप्रकमाबाबत माहिती देण्यात येत आहे. मात्र तलावात बंदीच्या निर्णयाला अनेक गणेशोत्सव मंडळांनी विरोध केला आहे. बुधवारी वसईच्या विश्वकर्मा सभागृहात प्रभाग समिती एचतर्फे आयोजित बैठकीत अनेकांनी विरोध दर्शवला.

ट्रकमधून गणेशमूर्ती दगडखाणीतील तलावात नेताना त्या योग्य तऱ्हेने नेल्या जातील का, असा सवाल काहींनी उपस्थित केला. पीओपीच्या मूर्ती दगडखाणीतील तलावात विसर्जित केल्या जाणार असून शाडू मातीच्या मूर्ती या कृत्रिम तलावात विसर्जित केल्या जाणार आहेत. त्यासाठी १३१ कृत्रिम तलाव बांधण्यात आल्याचे पालिकेने सांगितले आहे.

मात्र ऐनवेळी पीओपीच्या मूर्ती रद्द करता येणार नाही तसेच शाडू मातीच्या मूर्ती मोठय़ा आकारात तयार होत नाहीत, असे काही मंडळानी सांगितले.

ज्या मूर्ती विसर्जनासाठी तलावात येतील त्या जमा करून ट्रकमधून दगडखाणीतील तलावात नेल्या जाणार आहेत. मात्र त्यापेक्षा पालिकेने प्रत्येक प्रभागात जाऊन या मूर्ती संकलित कराव्यात अशी सूचना जनहित फाऊंडेशनचे अध्यक्ष दिलीप डाबरे यांनी केली.

महापालिकेकडून पाहणी

पालिकेने राजावली (वसई), पेल्हार (नालासोपारा) आणि चंदनासार (विरार) या तीन ठिकाणी दगडखाणींचे तलाव विसर्जनासाठी निश्चित केले आहेत. गुरुवारी या बंद दगडखाणी  आणि तलावांची पाहणी अतिरिक्त आयुक्त आशीष पाटील, कार्यकारी अभियंता लाड, उपायुक्त नानासाहेब कामठे तसेच प्रभाग समिती जी  सहायक आयुक्त धनश्री शिंदे यांनी केली. त्यांनी दगडखाणीत कशाप्रकारे विसर्जन केले जाईल, त्याचा आढावा घेतला. भाविकांकडून गणेशमूर्ती स्वीकारून त्या ट्रकमध्ये ठेवल्या जातील आणि या दगडखाणींच्या तलावात नेऊन विसर्जित केल्या जाणार आहे. हे विसर्जन योग्यरीतीने पार पडावे यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असल्याचे पालिकेने सांगितले. यामुळे कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasai virar municipal corporation banned immersion in city pond to prevent pollution zws
First published on: 19-08-2022 at 01:23 IST