वसई: वाढीव पाणीपट्टी, घरपट्टी वाढ आणि शहरातील अनियमित पाणीपुरवठ्याच्या विरोधात भाजप नगरसेवकांनी सोमवारी पालिका महासभेपूर्वी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर तीव्र निदर्शने करत ठिय्या आंदोलन केले.
वसई-विरार महापालिकेने १७ जानेवारी २०२५ च्या प्रस्तावानुसार पाणीपट्टीत मोठी दरवाढ लागू केली असून, त्याची वाढीव देयके नागरिकांना वितरित करण्यात आली आहेत. यापूर्वी जुलै महिन्यात पार पडलेल्या महासभेतही या मुद्द्यावरून जोरदार गदारोळ झाला होता. त्यावेळी भाजप नगरसेवकांनी सभात्याग केला होता.
सोमवारी आयोजित महापालिकेच्या सर्वसाधारण महासभेपूर्वी भाजप नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. वाढीव पाणीपट्टी तात्काळ रद्द करा आणि नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करा, अशी आक्रमक मागणी नगरसेवक मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात करण्यात आली.
याबाबत बोलताना विरोधीपक्ष नेते मनोज पाटील म्हणाले की, एकीकडे शहरात पुरेसा आणि नियमित पाणीपुरवठा होत नाही. अनेक भाग अद्यापही पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करत आहेत. ही समस्या सोडवण्याच्या नावाखाली टँकरवर लाखो रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. तर दुसरीकडे पाणीपट्टी दुप्पट करून नागरिकांची लूट सुरू आहे. त्यातच घरपट्टीतही २५ टक्के वाढ करून महापालिकेने जनतेवर मोठा आर्थिक अन्याय केला आहे. वाढीव पाणीपट्टी व घरपट्टी रद्द करून नागरिकांवरील अतिरिक्त कराचा बोजा त्वरित हलका करावा, तसेच शहरातील पाणीपुरवठा सुळीत करावा, अशी मागणी भाजप नगरसेवकांनी केली. मागण्या मान्य न झाल्यास जनतेच्या हक्कासाठी हा संघर्ष अधिक तीव्र करण्याचा इशाराही भाजप नगरसेवकांनी प्रशासनाला दिला.
