वसई: प्रतिदिन १०० किलो किंवा त्यापेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या घाऊक कचरा निर्मात्यांसाठी वसई विरार महापालिकेने नवे नियम लागू केले आहेत. यात कचऱ्याचे वर्गीकरण आणि विल्हेवाटीसाठी विशेष नियम घालून देण्यात आले असून या नियमांच्या अंमलबजावणीसाठी ३० ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

वसई विरार शहरात दररोज १,००० ते १२,०० मेट्रिक टन कचऱ्याची निर्मिती होते. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी भोयादापाडा येथील कचराभूमीत शहरातील कचरा जमा केला जातो. मात्र, अनेक महिन्यांपासून कार्यान्वित नसलेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि कचराभूमीतील अपुरी जागा यामुळे दैनंदिन निघणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे पालिकेसाठी आव्हानात्मक बनले आहे.

याच पार्श्वभूमीवर प्रतिदिन १०० किलो किंवा त्यापेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या, २० हजार चौ.मी. पेक्षा अधिक क्षेत्रफळ असणाऱ्या व प्रतिदिन ४० हजार लीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाण्याचा वापर करणाऱ्या घाऊक कचरा निर्मात्यांसाठी घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार पालिकेकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यात ५० पेक्षा जास्त सदनिका असलेल्या गृहनिर्माण संस्था, उपाहारगृहे, रुग्णालये, मॉल, शैक्षणिक संस्था, विवाह/संमेलन सभागृहे, कारखाने, इत्यादींचा समावेश असणार आहे.

पालिकेच्या नियमानुसार, घाऊक कचरा निर्मात्यांना ओला, सुका, सॅनिटरी आणि घातक कचरा अशाप्रकारे कचऱ्याचे वर्गीकरण करावे लागणार आहे. तसेच ओल्या व सुक्या कचऱ्याची स्थानिक स्तरावर वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच ओला व सुका कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे प्रमाणपत्र प्रभाग समिती कार्यालयातील घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून प्राप्त करून घेणे, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे, तसेच कचरा प्रक्रियेसाठी पालिकेच्या मान्यताप्राप्त सेवा पुरवठादाराची निवड करणे आणि पॅनेलबाहेरील पुरवठादार असल्यास त्याची मनपाकडे नोंदणी असणे आवश्यक असणार आहे.

या नव्या नियमांच्या अंमलबजावणीसाठी पालिकेकडून ३० ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प यशस्वीरीत्या राबविणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना मालमत्ता करात ५% सवलत दिली जाणार आहे. मात्र, या नियमांची अंमलबजावणी करण्यात दिरंगाई करणाऱ्या आस्थापनांविरोधात मुदत संपल्यानंतर दंडात्मक कारवाई केली जाईल, असे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

स्वयंघोषणापत्र जमा करणे आवश्यक:

महापालिकेकडून घाऊक कचरा निर्मात्यांची यादी तयार करण्यात आली आहे. या आस्थापनांचा कचरा मनपाच्या दैनंदिन कचरा वाहतूक गाड्यांमध्ये घेतला जाणार नाही. त्यामुळे महानगरपालिकेच्या यादीतील ज्या आस्थापनांचा कचरा १०० किलोपेक्षा कमी निर्माण होत असेल, त्यांनी ३० दिवसांच्या आत घनकचरा व्यवस्थापन विभाग किंवा प्रभाग समिती कार्यालयात स्वयंघोषणापत्र/अर्ज जमा करणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांना घाऊक कचरा निर्माता घोषित केले जाईल, असे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.