वसई: वसई-विरार महापालिका हद्दीतील कामगार, फेरीवाले, आदिवासी पाड्यातील नागरिक आणि सामान्य जनतेच्या प्रलंबित मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व पक्षाच्या जनसंघटनांच्यावतीने बुधवारपासून महापालिकेत बेमुदत पिठलं-भाकरी आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. तर विशेष म्हणजे महासभेच्या दिवशीच हे आंदोलन पुकारले जाणार आहे.

आदिवासी पाड्यात रस्ते, शौचालय व पाणीपुरवठा अशा मूलभूत सुविधांचा अभाव, पालिकेच्या चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या व फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणी याबाबत महापालिका प्रशासनाविरोधात अनेकदा आंदोलने पुकारण्यात आली आहेत. मात्र, वारंवार झालेले पत्रव्यवहार व शिष्टमंडळाच्या भेटींदरम्यान आश्वासने देऊनही अंमलबजावणी झाली नसल्याने पालिकेविरोधात बेमुदत पिठलं-भाकरी आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेतला असल्याचे आंदोलकांनी सांगितले. तसेच जोपर्यंत आंदोलकांच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत, तोवर आंदोलन सुरू राहील, अशी प्रतिक्रिया भाकपचे कॉ. शेरू वाघ यांनी दिली आहे.

महापालिका हद्दीतील कामगारांचे वेतन, सेवाशर्ती, सुरक्षा, सामाजिक सुरक्षा, बोनस व इतर न्याय्य हक्क तात्काळ पूर्ण करणे, ५ ऑगस्ट २०२६ च्या आंदोलनानंतर फेरीवाल्यांना देण्यात आलेली आश्वासने लगेच पूर्ण करणे, आदिवासी पाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची नळजोडणी व पाणीपुरवठा तात्काळ सुरू करणे, वर्षानुवर्षे वस्ती असलेल्या आदिवासी बांधवांना घरपट्टी देणे, २०११ पूर्वीच्या अतिक्रमणांच्या नियमितीकरण प्रक्रियेची तात्काळ अंमलबजावणी करणे, रस्ते, गटार, स्वच्छता, आरोग्य व शिक्षणासह नागरी सुविधांच्या तक्रारींवर वेळेत उपाययोजना करणे, या प्रमुख मागण्या आंदोलनादरम्यान मांडण्यात येणार आहेत.