वसई: पावसाळा सुरू होताच वसई-विरार शहरातील धोकादायक व अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. महापालिकेने यावर्षी केलेल्या सर्वेक्षणात ७४ इमारती अतिधोकादायक असल्याचे आढळून आले आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेने या इमारती रिकाम्या करून तातडीने जमीनदोस्त करण्यास सुरुवात केली असून, आतापर्यंत १९ इमारती निष्कासित करण्यात आल्या आहेत.
वसई-विरार महापालिका क्षेत्रातील विविध भागांत अनेक वर्षे जुन्या झालेल्या इमारती आणि बांधकामे आहेत. त्यातील बहुतांश इमारती अत्यंत जीर्ण झाल्या असून धोकादायक स्थितीत उभ्या आहेत. शहरात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी होऊ नये, यासाठी पालिकेने धोकादायक व अतिधोकादायक इमारतींचे सर्वेक्षण आणि स्ट्रक्चरल ऑडिट (लेखापरीक्षण) करून संबंधितांना इमारती खाली करणे तसेच दुरुस्ती करण्याबाबत नोटिसा बजावल्या होत्या.
यंदाच्या सर्वेक्षणात आढळून आलेल्या ७४ अतिधोकादायक इमारतींपैकी ‘जी’ आणि ‘डी’ प्रभागात सर्वाधिक इमारतींचा समावेश आहे. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसात नालासोपारा आणि विरार येथे इमारतीचा स्लॅब कोसळणे व इमारत एका बाजूला झुकण्याच्या घटना घडल्या होत्या. तसेच, मागील वर्षी गणेशोत्सवादरम्यान ‘रमाबाई अपार्टमेंट’ ही इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १७ जणांना प्राण गमवावे लागले होते, तर ९ जण गंभीर जखमी झाले होते.
अशा प्राणघातक दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महापालिका प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले आहे. कारवाईचा भाग म्हणून पालिका प्रशासन, पोलीस आणि महावितरण विभागाची एक संयुक्त आढावा बैठक पार पडली. या बैठकीत ठरलेल्या रूपरेषेनुसार बुधवारी पालिकेच्या विविध प्रभाग समित्यांमार्फत, कडक पोलीस बंदोबस्तात पाडकामाची धडक मोहीम राबवण्यात आली. आतापर्यंत ७४ पैकी १९ इमारती रिकाम्या करून जमीनदोस्त करण्यात आल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. उर्वरित इमारतींवरही टप्प्याटप्प्याने कारवाई सुरूच राहील, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.
इमारतींच्या दर्जावर प्रश्नचिन्ह; महापालिकेचे स्ट्रक्चरल ऑडिटचे आवाहन
अलीकडच्या काळात वसई-विरार शहरात ‘धोकादायक’ यादीत नसलेल्या काही नव्या-जुन्या इमारतींमध्येही स्लॅब आणि छताचा भाग कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. इमारतीचे वय कितीही असो, सर्व गृहनिर्माण संस्था, मालक आणि व्यवस्थापनाने दरवर्षी अधिकृत ‘स्ट्रक्चरल इंजिनिअर’कडून ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करून घेणे बंधनकारक आहे. ऑडिट अहवालानुसार आवश्यक दुरुस्ती, मजबुतीकरण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने कराव्यात, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
प्रभाग निहाय धोकादायक इमारती प्रभाग अतिधोकादायक
ए – १२
बी – १
सी- ७
डी- १४
ई- ११
एफ – ०४
जी – १५
एच – ००
आय- १०
एकूण ७४
