वसई: जनगणना २०२७ च्या जनगणनेसाठी वसई विरार महापालिकेकडून क्षेत्रीय प्रशिक्षकांसाठी दहा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारपासून या प्रशिक्षण शिबिराला सुरुवात होणार आहे.

सन २०११ नंतर २०२७ मध्ये देशात जनगणना पार पडणार आहे. तसेच यंदाची जनगणना ही देशातील आठवी जनगणना असून पहिल्यांदाच डिजिटल पद्धतीने पार पडणार आहे. त्यामुळे जनगणना २०२७ ची पूर्वतयारी म्हणून विरार पश्चिमेतील बोळींज येथील प्रभाग समिती ए च्या नवीन कार्यालयात क्षेत्रीय प्रशिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सोमवार, ६ एप्रिलपासून गुरुवार, १६ एप्रिल पर्यंत चालणार आहे.

महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, आगामी जनगणनेचे नियोजन दोन प्रमुख टप्प्यांत करण्यात आले आहे. जनगणनेचा पहिला टप्पा घरयादी व घरगणना यादी असून हा टप्पा १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडेल. यासाठी यासाठी प्रगणक आणि पर्यवेक्षकांची नियुक्ती केली जाणार असून, त्यांना एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात प्रशिक्षण दिले जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात मुख्य जनगणना पार पडणार असूनही प्रक्रिया फेब्रुवारी २०२७ मध्ये राबवली जाणार आहे.

या प्रशिक्षणासाठी मास्टर ट्रेनर म्हणून डॉ. महादेव इरकर आणि मुंबई जनगणना निर्देशालयाचे संजय नाईक हे क्षेत्रीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यंदाची जनगणना ‘डिजिटल’ स्वरूपाची असल्याने, मोबाइल ॲप्सचा वापर, डिजिटल डेटा एन्ट्री आणि जनतेशी संवाद साधताना पाळावयाची अचूकता यावर विशेष भर दिला जाणार आहे.

महापालिका आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त (जनगणना) संजय हेरवाडे आणि उपायुक्त हर्षला राणे (शहर जनगणना अधिकारी) यांच्या समन्वयातून ही प्रक्रिया राबवली जात आहे. या प्रशिक्षणामुळे जनगणना प्रक्रिया अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि परिणामकारक होईल, असा विश्वास आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी व्यक्त केला आहे.