वसई: निवडणुकीच्या काळात मतदारांना मोठी मोठी आश्वासने देणाऱ्या आणि विकासाच्या गप्पा मारणाऱ्या उमेदवारांची कसोटी निवडणूक आयोगाच्या एका प्रश्नांमुळे लागली आहे. “नगरसेवक म्हणून निवडून आल्यास शहराचा विकास कसा करणार?” या विषयावर निबंध लिहिताना वसई विरारमधील अनेक भावी नगरसेवकांची लेखणी अडखळली असून विकासाचा निबंध लिहिण्यात अनेक उमेदवार नापास ठरल्याचे चित्र दिसून येत आहे.

राज्य निवडणूक आयोगाने केलेल्या घोषणेनंतर गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुका अखेर पार पडत आहेत. उमेदवारी अर्ज भरताना पारदर्शकता राहावी आणि उमेदवारांशी शहराच्या विकासप्रती असणारी दृष्टी स्पष्ट व्हावी, यासाठी निवडणूक आयोगाने एक महत्त्वाची अट घातली होती. उमेदवारी अर्ज भरताना निवडून आल्यावर प्रभागाचा किंवा शहराचा विकास कशाप्रकारे करणार याबाबतचा कमीत कमी १०० ते जास्तीत जास्त ५०० याबाबतचा एक निबंध लिहिणे उमेदवारांना बंधनकारक करण्यात आले होते.

पण प्रचारादरम्यान तासंतास भाषणे करणाऱ्या, नागरिकांना शहराच्या विकासाची स्वप्न दाखवत मोठी मोठी आश्वासने देणाऱ्या उमेदवारांची हा निबंध लिहिताना मात्र मोठी दमछाक झाली. अनेकांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत अगदी एक दोन ओळींत प्रश्नाचे उत्तर उरकले. तर काहींनी मात्र या प्रश्नाचा रकानच रिकामा ठेवला. पण निवडणूक अधिकाऱ्यांनी आक्षेप घेताच, आयत्यावेळी “मी शहराचा विकास करेन किंवा जनतेची सेवा करेन” असे एका ओळीचे उत्तर लिहित वेळ मारून नेली.

यामुळे नागरिकांकडे मत मागणाऱ्या उमेदवारांना शहरातील रस्ते, पाणी, आरोग्य आणि कचरा व्यवस्थापनासारख्या गंभीर प्रश्नांबाबत साधे ज्ञानही नसल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, शहरातील काही मोजक्या सुशिक्षित आणि अभ्यासू उमेदवारांनी आपला विकास आराखडा सविस्तरपणे मांडला असून, बहुतांश उमेदवारांच्या या ‘कोऱ्या’ किंवा ‘अस्पष्ट’ निबंधांमुळे भावी नगरसेवकांची आश्वासने म्हणजे केवळ बाताच असल्याच्या चर्चा मतदारांमध्ये सुरू झाल्या आहेत.