वसई: वसई विरार महापालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडीला दहा दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. त्यामुळे पहिली महासभा कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर पहिल्या महासभेला मुहूर्त मिळाला असून येत्या २० फेब्रुवारी २०२६ ला पहिली महासभा पार पडणार आहे. यात १६ स्थायी समितीच्या सदस्यांची निवड प्रक्रिया पार पडणार आहे.
वसई-विरार महापालिकेच्या महापौर, उपमहापौर यांच्या निवडीनंतर आता विविध समिती सदस्यांच्या नियुक्तींकडे तसेच स्थायी समिती सभापती, सभागृह नेता, विरोधी पक्षनेता आणि सर्व विषय समिती सभापती पदावर कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सदस्य निवडीसाठी बविआ आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.
वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे काँगेसच्या एका उमेदवारासह ७१ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे पक्षीय संख्याबळानुसार त्यांना स्थायी समिती मध्ये १० सदस्यांना पाठविण्याची संधी असेल, तर याच सूत्रानुसार भाजपचे ६ सदस्य या समितीत जाणार आहेत.
महापौर, निवडणुकीचा उपमहापौर कार्यक्रम पार पडल्यानंतर आता पहिल्या महासभेत केवळ स्थायी समिती सदस्यांची निवड केली जाणार आहे. यासाठी २० फेब्रुवारीला पहिली महासभा बोलविण्यात आली आहे. या सभेत सदस्य निवड, प्रश्नोत्तरे, शासकीय परिपत्रक वाचन केले जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या नगरसचिवांनी दिली आहे.
महापालिकेचे आर्थिक निर्णय घेणारी समिती म्हणून स्थायी समिती समजली जात असून या समितीत येण्यासाठी दोन्ही राजकीय पक्षांकडून अनेक नगरसेवक इच्छुक आहेत.
