वसई: शुक्रवारी पार पडलेल्या वसई विरार महापालिकेच्या पहिल्याच महासभेत स्थायी समिती सदस्यांची निवड करण्यात आली.या समितीत एकूण १६ सदस्य निवडण्यात आले. यात बविआच्या १० तर भाजपकडून ६ सदस्यांची वर्णी लागली आहे.
वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे काँगेसच्या एका उमेदवारासह ७१ नगरसेवक तर महायुतीचे ४४ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे पक्षीय संख्याबळानुसार त्यांना स्थायी समितीवर बहुजन विकास आघाडीला १० सदस्य पाठविण्याची तर महायुतीला ६ सदस्य पाठविण्याची संधी होती.
वसई विरार महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर शुक्रवारी
महापौर अजीव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पहिली महासभा आयोजित करण्यात आली होती. या महासभेत महापौर व उपमहापौर अभिनंदन प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर स्थायी समिती सदस्य निवडीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. यासाठी दोन्ही गटनेत्यांकडून सदस्यांची नावं नगरसचिवांकडे देण्यात आली होती. पहिल्या महासभेत बविआचे १० व भाजपचे ६ सदस्य निवड करण्यात आली. महापौर अजीव पाटील यांच्या मार्फत हा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला.
स्थायी समितीत या सदस्यांचा समावेश
बहुजन विकास आघाडीकडून प्रवीण शेट्टी, नरेंद्र पाटील,लॉरेल डायस, पंकज पाटील, रंजना थालेकर, प्रफुल्ल पाटील, चंद्रशेखर धुरी, सुनील आचोळकर, स्वप्निल कवळी व आलमगीर डायर या नगरसेवकांचा समावेश आहे तर भाजप मधून प्रज्ञा पाटील, महेश सरवणकर, दर्शना त्रिपाठी, निलेश चौधरी, जितेंद्र पाटील, अभय कक्कड हे नगरसेवकांची स्थायी समिती सदस्य पदी नियुक्ती केली आहे.
