वसई: वसई विरार शहरात अतिवृष्टीमुळे वाहतूक सेवा विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागले. त्यामुळे सलग दोन दिवस महापालिकेच्या परिवहन विभागाकडून नागरिकांना मोफत बस सुविधा पुरविण्यात येणार आहे.

वसई विरार शहरात महापालिकेच्या परिवहन विभागाकडून बससेवा पुरवली जाते. एकूण ३६ महामार्गांवर पालिकेच्या गाड्या धावतात. शहरांतर्गत प्रवास करणारे हजारो प्रवासी दररोज या बससेवेचा लाभ घेतात. मात्र, वसई विरार शहरात आठवडाभरात पडलेल्या पावसामुळे ही बससेवा ठप्प झाली होती.

यामुळे नागरिकांना खाजगी वाहने, रिक्षा आणि गेल्या काही दिवसात ५० ते ५०० रुपये प्रतिसीट मोजावे लागत होते. बुधवारी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर महापालिकेकडून वसई आणि विरारमधील काही भागात बारा बसेसच्या माध्यमातून सेवा पुरवली जात होती. तर गुरुवारी बहुतांश भागातील पाणी ओसरल्यामुळे पालिकेची परिवहन सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली आहे.

तसेच नागरिकांना सुरक्षित, अखंड व विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देण्याच्या तसेच नागरिकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने ९ जुलै दुपारी २ वाजेपासून ते १० जुलै  रात्री १२ वाजेपर्यंत नागरिकांना मोफत बससेवा पुरवली जाणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.