वसई: वसई विरार महापालिकेच्या जी प्रभाग समितीच्या कार्यालयातील उद्वाहक यंत्र अखेर तीन महिन्यांनी सुरू करण्यात आली आहे. यामुळे शासकीय कामांनिमित्त कार्यालयात येणाऱ्या दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

वसई पूर्वेला वालीव नाका येथे जी प्रभाग समितीचे कार्यालय आहे. नगरपालिकेशी संबंधित समस्यांचे निराकरण, मालमत्ता कर, जन्म-मृत्यू नोंदणी, रस्ते आणि गटारे दुरुस्ती, परवाने नूतनीकरण अशा विविध कामांसाठी नागरिक या कार्यालयाग ये-जा करत असतात. पण या कार्यालयात पुरेशा सोयी सुविधा नसल्यामुळे पालिकेकडून वसई पूर्वेतील फादरवाडी येथील बहुउद्देशिय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर जी प्रभाग समितीचे कार्यालय स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मात्र, नव्या इमारतीतील उद्योग यंत्रही बंद असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांगांना दोन मजले चढून कार्यालय गाठावे लागत होते. यामुळे उद्वाहक यंत्र सुरू करावे अशी मागणी अपंग जनशक्ती संस्थेचे अध्यक्ष देविदास केंगार यांनी केली. सततचा पाठपुरावा आणि पत्रव्यवहार यामुळे पालिकेकडून या मागणीची दखल घेण्यात आली असून तब्बल तीन महिन्यांनी उद्वाहक यंत्र सुरू करण्यात आले आहे.

उद्वाहक यंत्र सुरू झाले असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांना दिलासा मिळाला असून कार्यालयात ये – जा करणे सोयीचे झाले असल्याची भावना त्याच्याकडून व्यक्त केली जात आहे.