वसई: वसई विरार शहरातील वाढता प्लास्टिकचा वापरामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर पालिकेने कापडी पिशव्यांची निर्मिती करण्यावर भर दिला आहे. १ लाख कापडी पिशव्या तयार केल्या जाणार असून सद्यस्थितीत ३० हजार कापडी पिशव्या महिला बचत गटाकडून तयार करवून घेतल्या आहेत.याशिवाय उर्वरित पिशव्या तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.वसई विरार शहरात प्लास्टिक बंदी लागू असतानाही छुप्या मार्गाने शहरात दाखल होत आहे. त्यामुळे शहरा प्लास्टिक पिशव्या वापराचे प्रमाण वाढले आहे. भाजी विक्रेते, फळविक्रेते, दुकानदार, फेरीवाले अशा ठिकाणी प्लास्टिकच्या पिशव्याचा वापर सुरूच आहे.दैनंदिन कचऱ्यात ही त्याचे प्रमाण अधिक दिसून येत आहे.या प्लास्टिकच्या अतिवापरामुळे पर्यावरणावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. या प्लास्टिकवर नियंत्रण मिळविण्यासाठी आता महापालिकेने विविध प्रकारच्या उपाययोजना आखण्यास सुरवात केली आहे. याच धर्तीवर आता पालिकेने कापडी पिशव्यांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे.

पहिल्या टप्प्यात सुमारे १ लाख कापडी पिशव्या निर्मितीचा संकल्प केला आहे. यासाठी सुरवातीला ३५ हजार मीटर इतके कापड खरेदी करण्यात आले आहे. पिशव्या शिवून घेण्यासाठी शहरातील १७ महिला बचत गटांची निवड केली असून त्यांच्या द्वारे या कापडी पिशव्या शिवून घेतल्या जात आहेत सद्यस्थितीत ३० हजार इतक्या कापडी पिशव्या शिवून झाल्या असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.

या तयार केलेल्या कापडी पिशव्या आहेत. त्या दैनंदिन बाजार विक्रेते आहेत त्यांना वाटप केल्या जातील व जो ग्राहक त्यांच्याकडे जाईल त्यावेळी ती कापडी पिशवी देऊन दहा रुपये घ्यायचे आणि पुन्हा तोच ग्राहक पुन्हा त्या विक्रेत्याकडे खरेदीसाठी गेला आणि प्लास्टिक पिशवी सोबत नेली तर त्या ग्राहकाला दहा रुपये परत केले जातील. यामुळे प्लास्टिक पिशवी वापराला निर्बंध लागून कापडी पिशवी वापरण्याची एक  सवय निर्माण होईल असे महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सांगितले आहे.

प्लास्टिक अत्यंत घातक असून नाल्यात, चेंबर अशा ठिकाणी अडकून अडचणी निर्माण करते त्यामुळे शहर प्लास्टिकमुक्त कसे करता येईल यासाठी विविध उपक्रमातून पालिकेचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

२५ कापड पिशव्या वेडिंग यंत्र घेणार

प्लास्टिक पिशव्यांच्या वापराला आळा घालण्यासाठी आता  शहरातील विविध ठिकाणच्या भागात कापड पिशव्या वेंडिंग यंत्रणा सुद्धा बसविण्यात येणार आहे. यासाठी सुरवातीला २५ कापडी पिशव्या यंत्र  घेतली जाणार आहेत. यासाठी पालिकेने निविदा काढून संबंधित अंदाजपत्रक मागविण्यात आली असल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी सांगितले आहे. या यंत्रामुळे नागरिकांना सहज कापडी पिशवी उपलब्ध होईल. त्यामुळे हळूहळू का होईना प्लास्टिक पिशव्या वापरण्याचे प्रमाण कमी होईल असा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे.

कारवाईत ५२ टन प्लास्टिक जप्त

प्लास्टिक वापरावर बंदी असतानाही शहरात बेकायदेशीर मार्गाने प्लास्टिकचा वापर सुरूच आहे. त्याचा परिणाम हा पर्यावरणावर होऊ लागला आहे. त्याच अनुषंगाने महापालिकेने पथके नियुक्त करून कारवाई सुरू केली आहे. १ जुलै २०२२ पासून आतापर्यंत पालिकेने शहरातील ६ हजार ६८० ठिकाणी तपासणी केली असून त्यात ९१२ ठिकाणी प्लास्टिक वापर होत असल्याचे आढळून आल्याने कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण ५२ टन इतके प्लास्टिक जप्त करून १९ लाख ६१ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जप्त केलेले प्लास्टिक हे रिसायकलिंग साठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शासनाने दिलेल्या निर्देशानुसार प्लास्टिकला आळा घालण्याच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना आहेत त्या करण्याचे काम सुरू आहे. प्लास्टिक कारवाई, कापडी पिशव्या निर्मिती, जनजागृती असे कार्यक्रम आम्ही राबवित आहोत.- नानासाहेब कामठे, उपायुक्त वसई विरार महापालिका.