वसई- वसई विरार महापालिकेने शहरातील अतिमहत्वाच्या २४५ व्यक्तींची (व्हीआयपी) यादी प्रसिध्द केली आहे. त्यामध्ये फक्त विविध शासकीय अधिकारी आणि  राजकारण्यांचा भरणा करण्यात आला आहे. वसई विरार शहरात विविध क्षेत्रातील मान्यवर असताना त्यापैकी एकाचाही यादीत समावेश नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

वसई विरार महापालिका विविध उपक्रम राबवत असते. या उपक्रमांसाठी शहरातील मान्यवरांना आमंत्रण देण्यात येते. अशा कार्यक्रमात त्यांना मानाचे स्थान देण्यात येत असते. यासाठी पालिकेने शहरातील अतिमहत्वाच्या व्यक्तींची यादी तयार करण्यात आली आहे. या यादीतील लोकांना अतिमहत्वाचा दर्जा देण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते डॉ दिनेश कांबळे यांनी या अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या यादीत कोण आहे त्याची माहिती माहिती अधिकारात विचारली होती. पालिकेने दिलेल्या यादीत २४५ जणांचा समावेश आहे. या यादी मध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यी राज्याचे सचिवांपासून आजी माजी खासदार, आजी माजी नगरसेवक, सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. मात्र शहरातील एकही साहित्यिक, कलावंत, चित्रकार, खेळाडू, डॉक्टर्स, प्राध्यापक यांचा समावेश नाही. याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.

हेही वाचा >>>मालमत्ता थकबाकीदारांना पालिकेचा दणका; पालिकेकडून मालमत्ता जप्तीच्या नोटिसा बजावण्यास सुरवात

वसई विरार महापालिकेने यादी तयार करताना सर्वच क्षेत्रातील महत्वाच्या व्यक्तींना स्थान देणे आवश्यक होते. वसई शहरात अनेक राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर नावाजलेले मान्यवर राहतात. त्यांचा यादीत समावेश केला असता तर पालिकेची शोभा वाढली असती. परंतु केवळ राजकारणी, पोलीस, पालिका आणि शासकीय अधिकार्‍यांचा समावेश करण्यात आला आहे, असे कांबळे यांनी सांगितले. राज्याचे सचिव, मंत्री, माजी अधिकारी यांचा तर राजशिष्टाचार असतो. मग पुन्हा त्यांना यादीत स्थान का असा सवालही त्यांनी केला.

अतिमहत्वाच्या व्यक्तींमध्ये राजशिष्टाचारानुसार अधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांच्या प्रमुखांचा समावेश असतो. परंतु शहरातील मान्यवरांचा समावेश करण्याबाबत विचार केला जाईल, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनी सांगितले.