|| प्रसेनजीत इंगळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दररोज १५ टक्के गळती, लाखो रुपयांचे नुकसान

विरार :  वसई विरार महानगर पालिकेला पाणी गळतीवर नियंत्रण न मिळू शकल्याने पाण्याच्या गळतीमुळे पालिकेला दररोज लाखो रुपयाचा फटका सहन करावा लागत आहे. दररोज होणाऱ्या एकूण पाणी वितरणाच्या १५ टक्के गळती पालिकेकडून होत असल्याची बाब माहिती अधिकारात  स्पष्ट झाली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल पिल्लई यांनी माहिती अधिकारात पाणी गळतीसंदर्भात माहिती मागितली होती. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार वसई-विरार महानगर पालिका दिवसाला २३० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करत आहे. यात १५ टक्के गळती असल्याचे पालिकेने सांगितले आहे. म्हणजे दिवसाला ३४.५ दशलक्ष लिटर पाणी पालिकेकडून वाया जात आहे. ही गळती इतर महानगर पालिकेच्या तुलनेने सर्वाधिक आहे. अशा पद्धतीने दर महिन्याला ३४. ५ दशलक्ष लिटर प्रमाणे पालिकेला दिवसाला ३ लाख ३१ हजार ४४१ रुपये पालिका वाया घालवत आहे. हेच गणित महिन्याचे मांडले असता ९९ लाख ४३ हजार २३० रुपये महिन्याला वाया घालवले जात आहेत. साधारणपणे दरवर्षी पालिकेचे ११ कोटी ९३ लाख रुपये दरवर्षी केवळ पाणी गळतीमुळे वाया जात आहेत. असे असतानाही पालिका पाणी वितरणाचे नियोजन सुधारण्याकडे कोणतेही लक्ष देत नाही. यामुळे नागरिकांचा कोट्यवधी कराचा पैसा वाया तर जात आहे पण शहरात अनेक विभागत नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करत टँकरने आपली तहान भागवावी लागत आहे.   

वसई-विरार शहराची लोकसंख्या पालिकेने २४ लाख गृहीत धरली आहे. सध्या शहराला सुर्या पाणी प्रकल्पाच्या दोन्ही टप्प्यातून २०० दशलक्ष लिटर, उसगाव आणि पेल्हार मधून ३० दलशक्ष लिटर असा मिळून दररोज २३० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होत असतो. वसई-विरार शहराची लोकसंख्या

झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पाण्याची मागणी वाढत आहे.

त्यातही प्रति माणशी १३५ दशलक्ष लिटर पाण्याची गरज असताना पालिकेकडून केवळ ११० लिटर पाणी सरासरी दिले जात आहे. शहरातील २४ लाख लोकसंख्येला ३५० दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. मात्र कमी पाणी आणि पाण्याची गळती मिळून दरररोज शहराला १२० दशलक्ष लिटर पाणी कमी मिळत आहे.  शहराच अमृत योजने अंतर्गत जलवाहिन्यांचे वितरण पुर्ण झालेले नाही. अनेक ठिकाणी जुन्या जलवाहिन्या आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. तर दररोज पाणी माफिया मोठ्या प्रमाणात पाण्याची चोरी करत आहेत. तसेच पालिकेकडून दुरुस्तीची कामे वेळेवर केली जात नाहीत. यामुळे केवळ गळतीमुळे जर दिवसाला ३४.५ दशलक्ष लिटर पाणी वाया जात असेल तर नागरिकांना पाणी कुठून मिळणार असा सवाल निर्माण झाला आहे.

नळजोडण्यांना परवानगी बंद

दररोज नवनवीन इमारती उभ्या राहत असल्याने पाण्याची मागणी वाढत आहे. परंतु पाणी गळतीमुळे पाणीपुरवठा कमी होत असल्याने पालिकेने चक्क नवीन नळजोडण्यांना परवानगी देणे मागील दोन वर्षांपासून बंद केले.   सध्या धरणात पाणी मुबलक असताना सुद्धा पालिकेकडून एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. यामुळे नागरिक पाणीटंचाईच्या झळा सोसत आहेत. सध्या पालिकेकडे २ हजार ३०८ नवीन नळजोडण्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. तर सध्या पालिकेने नळ जोडण्यांचे अर्ज स्विकारणे बंद केले आहे. त्यामुळे नागरिकांना नाईलाजाने टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. पाणी गळतीमुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. 

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasai virar municipal corporation has the highest water leakage akp
First published on: 28-10-2021 at 00:24 IST