वसई: वसई-विरार शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पावसाचा मोठा फटका विरार पश्चिमेकडील यशवंत नगर येथे असलेल्या वसई-विरार महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाला बसला आहे. मुख्यालयाच्या चारही बाजूंना मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने पालिकेच्या दैनंदिन कामकाजावर गंभीर परिणाम झाला असून, गेल्या दोन दिवसांपासून आपत्कालीन यंत्रणा वगळता इतर सर्व कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे.
मुखल्यालाच्या आवारात कंबरभर पाणी साचल्यामुळे सामान्य नागरिकांना विविध कामांसाठी पालिकेत ये-जा करणे अशक्य झाले आहे. तसेच, पालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांनाही कार्यालयात येण्यासाठी चक्क ट्रॅक्टरचा आधार घ्यावा लागत आहे. ट्रॅक्टरच्या मदतीनेच अधिकारी पालिकेत प्रवेश करत आहेत.
विशेष म्हणजे, विरार पश्चिमेच्या यशवंत नगर येथील हे मुख्यालय ७ मजली असून सुमारे ३ लाख चौरस फूट एवढ्या मोठ्या क्षेत्रफळात पसरलेले आहे. या भव्य इमारतीच्या बांधकामासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या इमारतीत पहिल्या दोन मजल्यांवर परिवहन भवन असून, तिसऱ्या ते सातव्या मजल्यापर्यंत मुख्य कार्यालय विस्तारले आहे. येथे आयुक्त आणि सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची अद्ययावत दालने, सभागृह आणि स्थायी समिती सभागृह आहे.
दररोज हजारो नागरिकांची वर्दळ असणाऱ्या मुख्यालयालाच शहरात निर्माण झालेल्या पूरस्थिती पाण्याचा वेढा पडला आहे. त्यामुळे नागरिकांना या ठिकाणी ये करण्यास अडचणी येत आहेत.
