वसई: वसई विरार महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकी नंतर रखडलेल्या विविध समित्यांच्या सभापती निवडीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. येत्या ८ मे रोजी महिला व बालकल्याण समिती आणि आरोग्य समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक पार पडणार असल्याचे प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आले आहे. या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वसई विरार महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका पार पडल्यानंतर २० फेब्रुवारीला महापालिकेची पहिली महासभा पार पडली. या सभेत शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘महिला व बालकल्याण’ आणि ‘आरोग्य’ समित्यांचे अधिकृत गठन करण्यात आले. विशेष म्हणजे, शहराचा वाढता विस्तार आणि गुंतागुंतीच्या समस्या लक्षात घेता, दोन्ही समित्यांची सदस्य संख्या ९ वरून १५ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला होता.
मात्र या सदस्य निवड प्रक्रियेनंतर या समित्यांचे सभापती आणि उपसभापती पदांच्या निवडणूका रखडल्या होत्या. या रखडलेल्या निवडणुकीवर महापौर अजीव पाटील यांनी राज्य शासन आणि प्रशासना बाबत नाराजी व्यक्त केली होती. अखेर आरोग्य समिती आणि महिला व बालकल्याण समिती सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीला हिरवा कंदील दाखविण्यात आला असून कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. येत्या ८ मे २०२६ रोजी या आरोग्य व महिला बालकल्याण समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले असून या निवडीसाठी पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांची पिठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
या निवडणुकीसाठी ६ मे ला दुपारी २ ते ५ या वेळेत इच्छुक उमेदवारांना आपले नामनिर्देशन पत्र (अर्ज) दाखल करता येतील. सायंकाळी ५:३० वाजता अर्जांची प्राथमिक यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.
