वसई : वसई विरार महापालिकेच्या आरोग्य आणि महिला बाल कल्याण समित्यांच्या सभापती व उपसभापती निवडणूक शुक्रवारी पार पडली. यात दोन्ही समित्यांवर सभापती आणि उपसभापती बविआचेच उमेदवार निवडून आले आहे. आरोग्य समितीवर सभापती म्हणून निलेश देशमुख तर महिला बालकल्याण सभापती पदी बिना फुटयार्डो यांची निवड झाली आहे.

वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीनंतर पहिल्या महासभेत ‘महिला व बालकल्याण’ आणि ‘आरोग्य’ समित्यांचे जाहीर केल्या होत्या. शहराचा वाढता विस्तार आणि गुंतागुंतीच्या समस्या लक्षात घेता, दोन्ही समित्यांची सदस्य संख्या ९ वरून १५ करण्यात आली होती. मात्र या सदस्य निवड प्रक्रियेनंतर या समित्यांचे सभापती आणि उपसभापती पदांच्या निवडणूका रखडल्या होत्या.

अखेर कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिलेल्या निर्देशानुसार शुक्रवारी (८मे) दोन्ही समित्यांच्या निवडणूका महापालिकेच्या सभागृहात घेण्यात आल्या. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, नगरसचिव विश्वनाथ तळेकर व दोन्ही समित्यांचे सदस्य उपस्थित होते.

बविआने आरोग्य सभापतीपदासाठी निलेश देशमुख आणि उपसभापतीसाठी निशाद चोरघे यांचे अर्ज भरले. तर महिला बालकल्याण समितीसाठी बविआच्या बिना फुर्ट्याडो आणि सुवर्णा पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

भाजपतर्फे आरोग्य सभापतीपदासाठी डॉ. योगिता करजंकर आणि उपसभापतीपदासाठी जितेश राऊत व महिला बालकल्याण समितीच्या सभापती पदासाठी सान्वी यंदे आणि उपसभापतीपदासाठी मिरा निकम यांनी उमेदवारी अर्ज सादर केले होते.

शुक्रवारी महापालिकेच्या सभागृहात आवाजी पध्दतीने यावर मतदान प्रक्रिया पार पडली. यात आरोग्य समिती सभापती निलेश देशमुख तर उपसभापती निशाद चोरघे यांची निवड झाली. तर महिला बालकल्याण समिती सभापती बिना फुटयार्डो आणि उपसभापती म्हणून सुवर्णा पाटील यांची निवड झाली. दोन्ही समित्यांवर बविआचेच सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे महिला आणि बालकल्याण व आरोग्य समितीवर बविआचेच वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले आहे.