वसई :- वसई विरार महापालिकेच्या आरोग्य आणि महिला बाल कल्याण समित्यांच्या सभापती आणि उपसभापतींची निवडणूक शुक्रवार ८ मे रोजी पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी बुधवारी बविआ आणि भाजपने आपल्या उमेदवारांचे अर्ज सादर केले.
वसई विरार महापालिकेने ‘महिला व बालकल्याण’ आणि ‘आरोग्य’ समित्यांचे जाहीर केल्या होत्या. शहराचा वाढता विस्तार आणि गुंतागुंतीच्या समस्या लक्षात घेता, दोन्ही समित्यांची सदस्य संख्या ९ वरून १५ करण्यात आली होती. मात्र या सदस्य निवड प्रक्रियेनंतर या समित्यांचे सभापती आणि उपसभापती पदांच्या निवडणूका रखडल्या होत्या. अखेर कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी येत्या ८ मे २०२६ रोजी या दोन्ही समित्यांच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत.
या निवडणुकीसाठी बुधवारी बहुजन विकास आघाडी आणि भाजप पक्षांनी या दोन्ही समित्यांच्या निवडणुकांसाठी अर्ज दाखल केले. बविआने आरोग्य सभापतीपदासाठी निलेश देशमुख आणि उपसभापतीसाठी निशाद चोरघे यांचे अर्ज भरले. तर महिला बालकल्याण समितीसाठी बविआच्या बिना फुर्ट्याडो आणि सुवर्णा पाटील यांनी अर्ज दाखल केले.
भाजपतर्फे आरोग्य सभापतीपदासाठी डॉ. योगिता करजंकर आणि उपसभापतीपदासाठी दिपेश राऊत यांचे अर्ज दाखल करण्यात आले. महिला बालकल्याण समितीच्या सभापती पदासाठी सान्वी यंदे आणि उपसभापतीपदासाठी मिरा निकम यांनी अर्ज दाखल केले आहेत.
