वसई: वसई विरार महापालिकेकडूनही विशेष एचपीव्ही लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत १४ वर्षे वयोगटातील मुलींचे लसीकरण केले जात असून आतापर्यंत अडीचशेहून अधिक मुलींचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

​पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २८ फेब्रुवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्तरावर या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला होता. त्यानंतर महाराष्ट्रात ८ मार्च २०२६ रोजी, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय मोहिमेची सुरुवात झाली. याच अनुषंगाने वसई-विरार महापालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील १४ वर्षे वयोगटातील मुलींना ही लस दिली जात आहे.

एचपीव्ही म्हणजे ‘हयुमन पॅपिलोमाव्हायरस’ हा एक अत्यंत सामान्य विषाणू आहे. मानवी पॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही) चे १०० पेक्षा जास्त प्रकार आहेत. गर्भाशय मुखाचा कर्करोग होण्यामागे ९५ टक्क्यांहून अधिक प्रकाणामध्ये या विषाणूचा संसर्ग कारणीभूत आढळतो. किशोरावस्थेत ही लस घेतल्यास भविष्यातील धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.

महापालिकेने सुरू केलेल्या लसीकरण मोहिमेत आतापर्यंत अडीचशेहून अधिक मुलींचे लसीकरण यशस्वीपणे पूर्ण केले आहे असे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांनी सांगितले. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून कर्करोग प्रतिबंधासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पालकांनी आपल्या १४ वर्षांच्या मुलींना जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जाऊन हे लसीकरण निश्चितपणे करून घ्यावे,” असे आवाहनही चौधरी यांनी केले आहे.

व्यापक मोहीम राबविणार

वसई विरार ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीम ही अधिक प्रभावीपणे राबविली जाणार आहे. शाळेत, शिक्षण पालक यांची बैठक घेतली जाईल व याची सविस्तर माहिती देऊन तेथेही लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे असे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.