वसई: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक सुरक्षितता आणि आरोग्याचा विचार करून वसई-विरार शहर महानगरपालिकेने भटक्या श्वानांसाठी महत्त्वाची नियमावली जाहीर केली आहे. शहरात श्वान दंशाच्या वाढत्या घटना लक्षात घेता महापालिकेने नऊ प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये ४५ ‘फीडिंग स्पॉट्स’ (श्वानांना खाद्य देण्याची ठिकाणे) निश्चित केली आहे. यावर येत्या १५ मे पर्यंत हरकती व सूचना मांडता येणार आहेत.

वसई विरार शहरात भटक्या श्वानांचा उपद्रव वाढत आहे. या वाढत्या उपद्रवामुळे श्वान दंश होण्याच्या घटना समोर येत होत्या. या उपद्रवाला रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांमधून केली जात होती.

शैक्षणिक संस्था, रुग्णालये, बस डेपो आणि रेल्वे स्थानके यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी श्वानांच्या वाढत्या त्रासावर चिंता व्यक्त होत असल्याने यावर उपाय म्हणून, भटक्या श्वानांना कोठेही अन्न न घालता प्रशासनाने निश्चित केलेल्या जागीच अन्न द्यावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याअनुषंगाने पालिकेने ही जागा निश्चिती केली आहे.

​या निर्णयामुळे आता श्वानांना पाळणाऱ्या किंवा त्यांना अन्न घालणाऱ्या नागरिकांना महापालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणीच अन्न द्यावे लागणार आहे. यामुळे सार्वजनिक ठिकाणी होणारी अस्वच्छता कमी होण्यास आणि श्वानांमुळे होणारे हल्ले टाळण्यास मदत होईल, असा विश्वास महापालिकेने व्यक्त केला आहे.

अशा आहेत जागा निश्चित

  • ​प्रभाग ‘ए’ (विरार पश्चिम):- पिंपळेश्वर मंदिर, ग्लोबल सिटी, म्हाडा कॉलनी, यशवंत नगर पाण्याची टाकी, आणि जे.पी. नगर यासह १३ ठिकाणी जागा निश्चित.
  • ​प्रभाग ‘बी’ व ‘सी’:- नालासोपारा पूर्व भागातील ओसवाल नगरी, साई प्लाझा आणि प्रगती नगर परिसर.
  • ​प्रभाग ‘डी’ व ‘ई’:- अग्रवाल नगरी मैदान, वसंत नगरी, आचोळे पोलीस स्टेशन जवळ आणि श्रीप्रस्था परिसर.
  • ​प्रभाग ‘जी’ :- नवकार टॉवर, सनटेक मॅक्सवर्ल्ड आणि सातिवली इंडस्ट्रियल एरिया.
  • ​प्रभाग ‘एच’ (सनसिटी/वसई): सनसिटी सेल्फी पॉईंट, मिरचंदानी बिल्डिंग परिसर आणि उमेळमान.
  • ​प्रभाग ‘आय’:- भाबोळा आणि भास्कर आळी बेनापट्टी, पापडी, खुरणवाडी खोचिवडे, पाचूबंदर डंपिंग ग्राउंड जवळ अशा ठिकाणी जागा निश्चित केल्या आहेत.

​महापालिकेने निश्चित केलेल्या या ४५ ठिकाणांबाबत नागरिकांच्या काही हरकती किंवा सूचना असल्यास त्या नोंदवण्यासाठी महापालिकेने १५ मे २०२६ पर्यँत मुदत दिली असून घनकचरा व्यवस्थापन विभाग मुख्यालयात या हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन केले आहे.