वसई: दरवर्षी पावसाळ्यात वसई-विरारकरांना पूर आणि वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसतो. यंदाच्या पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडू नये आणि मुख्यत्वे रस्ते तसेच नाल्यांवरील कलव्हर्ट (मोऱ्या) कोसळण्याच्या घटना टाळण्यासाठी वसई-विरार शहर महापालिकेने कंबर कसली आहे. महापालिका क्षेत्रातील सर्व लहान-मोठ्या कलव्हर्टचे सर्वेक्षण करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. आतापर्यंत शहरातील ६६ कलव्हर्टचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आहे त्यात ८ ठिकाणचे कलव्हर्ट अतिधोकादायक स्थितीत असल्याचे निदर्शनास आले आहे.
वसई विरार शहरात १९१ किलोमीटर लांबीचे नाले, खाड्या आहेत. या नाल्यावर व खाड्यांच्या वर कलव्हर्ट तयार करण्यात आले आहेत. यातील काही कलव्हर्ट हे अनेक वर्षे जुने झाले आहेत.
काही वेळा अतिवृष्टीमुळे शहरातील काही भागांत जुने कलव्हर्ट खचल्याच्या किंवा कोसळल्याच्या घटना समोर येत असतात. यामुळे केवळ वाहतूक ठप्प होते असे नाही, तर नागरिकांच्या जिवालाही धोका निर्माण होतो. अशा घटना रोखण्यासाठी महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी पी यांनी शहरातील कलव्हर्ट व गटारे यांचे सर्वेक्षण करण्यात यावे व आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने नऊ प्रभागात पथके नियुक्त करीत विविध ठिकाणच्या भागांतील कलव्हर्टचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू केले आहे. आतापर्यंत जुने झालेले जवळपास ६६ कलव्हर्टचे संरचनात्मक लेखापरीक्षण करण्यात आले आहे.
यात ८ कलव्हर्ट हे अतिधोकादायक (सी १) असल्याचे निदर्शनास आले त्या तोडून पुन्हा नवीन कलव्हर्ट तयार करावे लागणार आहेत तर तर २७ कलव्हर्ट ही सी २ ए आणि सी २ बी या वर्गवारीत येत असल्याने त्याची डागडुजी केली जाणार आहे. तर ३० कलव्हर्ट ही सुस्थितीत आहेत अशी माहिती महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.
शहरातील धोकादायक इमारतीच नव्हे तर पावसाळ्या आधी छोटे पूल व कलव्हर्ट यांची सुद्धा तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- पृथ्वीराज बी. पी., आयुक्त, वसई विरार महापालिका
सूचना फलक लावू
पावसाळा आता अगदी जवळ आला आहे त्यामुळे जे कलव्हर्ट धोकादायक आढळून आले आहेत. ते आता तोडून नवीन तयार करता येणार नाही यासाठी अशा ठिकाणी सूचना फलक लावणे, अवजड वाहनांना बंदी घालणे अशा तात्पुरता स्वरूपाच्या उपाययोजना केल्या जातील असे महापालिकेने सांगितले आहे.
