वसई: वसई विरार शहरात पावसाळ्यादरम्यान व पावसाळ्यापूर्वी वृक्ष छाटणी केली जाते. मात्र, यंदा नियमबाह्य पद्धतीने झाडांची छाटणी करण्यात आली असून याबाबत पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.
पावसाळ्यात कमकुवत झालेली झाडे किंवा झाडांच्या फांद्या पडून दुर्घटना घडू नये म्हणून दरवर्षी महापालिकेकडून झाडांच्या फांद्यांची छाटणी केली जाते. वसई विरार शहरातही नियुक्त कंत्राटदारांकडून पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यादरम्यान अशी दोन वेळा शहरातील मुख्य रस्ते, गृहसंकुले, आणि इतर वर्दळीच्या परिसरात असणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली.
झाडांची छाटणी करताना झाडांना इजा होणार नाही, अशा पद्धतीने फांद्या कापणे आवश्यक आहे. मात्र, वसईतील १०० फुटी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडांची अतिशय बेजबदारपणे छाटणी करण्यात आले असल्याची तक्रार पर्यावरणप्रेमींनी केली आहे. खासकरून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडांच्या फांद्या मोठ्या प्रमाणावर छाटण्यात आल्या असल्याचा आरोपही केला जात आहे.
झाडाच्या फांद्या फारच वाढलेले असल्यास किंवा वाहतुकीला व रहदारीला अडथळा ठरत असल्यास त्या कापणे गरजेचे आहे. मात्र, अनेक ठिकाणी झाडांच्या खोडावर देखील मोठे घाव घालण्यात आले आहेत. यामुळे झाड कमकुवत होऊन कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे बेजबाबदारपणे झाडांची छाटणी करणाऱ्या कंत्राटदारावर अशी मागणी केली जात आहे.
याबाबत वृक्षप्राधिकरण विभागाशी संपर्क साधला असता, चेंबूर येथे घडलेल्या घटनेनंतर खबरदारी म्हणून अतिशय बारकाईने झाडांची छाटणी करण्यात आली आहे. मात्र, ही छाटणी बेजबाबदारपणे झाली असल्यास माहिती घेऊन पुढील कारवाई केली जाईल.
