संवर्धनाबाबत वसई-विरार महापालिका उदासीन, पाच वर्षांत वृक्षगणना नाही

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रसेनजीत इंगळे, लोकसत्ता

वसई:राज्य शासनाने नवीन वृक्ष धोरण लागू केले असले तरी पालिकेकडे सक्षम वृक्ष विभाग नसल्याने शहरातील वृक्षसंवर्धन कसे करायचे याबाबत महापालिका अनभिज्ञ आहे. पाच वर्षांतून एकदा वृक्षगणना करणे आवश्यक असतानाही अजूनही पालिकेने कोणतीही पावले उचलली नाहीत. तसेच सध्याच्या वृक्षाबाबतची माहिती देखील पालिकेकडे नाही. पालिकेच्या या उदासिनतेमुळे शहारतील वृक्षसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

वसई-विरार शहर हे निसर्गरम्य शहर म्हणून ओळखले जाते. वसईच्या पश्चिम किनारपट्टीवर हिरवीगार झाडे आहेत. मात्र ही वृक्षसंपदा आता महापालिकेच्या उदासीनतेमुळे धोक्यात आली आहे. मागील ५ वर्षांत पालिकेने वृक्षगणनाच केलेली नाही. त्यात आता राज्य शासनाने वृक्षांच्या संवर्धनासाठी नवीन अध्यादेशदेखील जाहीर केला नाही. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन सुधारणा अधिनियम २०२१ नुसार अनेक नवे बदल करण्यात आले आहेत. यामध्ये पुरातन वृक्षाची माहिती घेऊन त्यांचे संरक्षण करणे, वृक्षारोपणअंतर्गत तितकी झाडे तोडली त्या झाडांच्या वयाच्या संख्येनुसार झाडे लावणे. झाडे लावताना किमान ६ फूट उंचीचे रोप लावणे, स्थानिक प्रजातीच्या वृक्षांची अधिक प्रमाणात लागवड करणे, नव्या भौगोलिक माहिती प्रणालीप्रमाणे झाडांवर लक्ष ठेवणे असे अनेक नवे नियम या नव्या धोरणात आणले आहेत. मात्र वसई-विरार महानगरपालिकेकडे सक्षम वृक्ष प्राधिकरण विभाग नसल्याने वृक्ष गणना कशी करावी आणि याच्या यंत्रणा कशा राबवाव्यात याबाबत पालिका अनभिज्ञ आहे.

पालिकेच्या मालकीची केवळ चार टक्के झाडे

महापालिका स्थापन होण्यापूर्वी तत्कालीन नवघर-माणिकपूर नगर परिषदेने २००८ साली वृक्षगणना केली होती. त्यानंतर पालिकेने सन २०१५ – १६ ला वृक्षगणना केली होती. त्यानंतर वृक्षगणना झालेली नाही. त्यानुसार पालिकेच्या नऊ प्रभागात १४ लाख १४ हजार ४६२ वृक्ष असल्याची नोंद  करण्यात आली होती. त्यातील ४ टक्के वृक्ष शासकीय मालकीचे आहेत. ९६ टक्के वृक्ष हे खासगी मालकीत असल्याने यावर पालिकेचे कोणतेही लक्ष नाही. मागील दोन वर्षांत करोनामुळे वृक्षलागवड करण्यात आलेली नाही. वृक्षगणना होऊन पाच वर्षे उलटली आहे. आता शहरात नेमकी किती झाडे आहेत, किती जगली आहे याची माहिती पालिकेकडे नाही. वृक्षसंवर्धनासाठी काय उपाययोजना आणि तरतुदी करायच्या तेदेखील पालिकेला माहीत नाही. नोंदीनुसार सरासरी आरोग्य आणि गुणवत्ता नसलेली झाडे यांच्यावर उपचार होणे गरजेचे असताना पालिकेने याबाबत काहीही केले नाही. यामुळे ही झाडे पाच वर्षांत मृत पावल्याची शक्यता वर्तवली जात आहे. झाडांच्या वयोमानाप्रमाणे वसई-विरारमधील ७१ टक्के झाडे ही प्रौढावस्थेत आहेत. तर २२ टक्के झाडे ही मध्यमवयीन आहेत, तर सात टक्के झाडे ही वृद्धावस्थेत आहेत. त्यानुसार पालिकेने  प्रौढावस्थेतील झाडांचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. मध्यमवयीन झाडांच्या वाढीसाठी उपाययोजना करणे गरजेचे होते. तर प्रौढावस्थेतील वृक्षाच्या तुलनेने अधिक वृक्षारोपण करणे आवश्यक होते. पण मागील दोन वर्षांत पालिकेने कोणतेही वृक्षारोपण केले नाही.

वसईचा पश्चिम पट्टा हा हरित भाग म्हणून ओळखला जातो. या क्षेत्रातील हिरवाई कायम राहावी अशी येथील नागरिकांची आणि पर्यावरणप्रेमींची अपेक्षा आहे. या क्षेत्रातील वृक्षांची स्थिती, जमिनीची प्रतवारी, कोणते वृक्ष आहेत, शहरातील जमिनीत कोणते वृक्ष जगतात, जल-ध्वनी-वायू प्रदूषण यासह विविध माहिती मिळविण्यासाठी साधारण पाच वर्षांतून एकदा वृक्षांची गणना करणे आवश्यक आहे.

शासनाच्या नव्या धोरणानुसार वसई विरार महानगरपालिका काम करत आहे, यासंदर्भात निविदा प्रक्रिया सुरू आहे, लवकरच प्रकिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात केली जाईल, अशी माहिती वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त गंगाथरन डी. यांनी दिली.

वसई विरार महानगरपालिका वृक्ष आणि पर्यावरणाच्या बाबतीत पूर्णत: उदासीन आहे. पालिका स्थापनेपासून पालिकेने आजतागायत कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत. शहरात मोठय़ा प्रमाणात बांधकामाच्या नावाखाली हजारो वृक्षांची कत्तल केली जाते. या संदर्भात पालिकेकडे शेकडो तक्रारी आहेत, पण आजतागायत एकही तक्रारीवर कारवाई केली नाही. यामुळे शहरातील वृक्षसंपदा धोक्यात आली आहे

समीर वर्तक, समन्वयक, पर्यावरण संवर्धन समिती, वसई

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasai virar municipal corporation indifferent about tree conservation in vasai zws
First published on: 21-10-2021 at 03:57 IST