वसई: वसई विरार महापालिकेच्या प्रभाग समिती अ च्या नवीन कार्यालयाच्या लोकार्पण निमंत्रण पत्रिकेवरून वाद निर्माण झाला आहे. या पत्रिकेतून आमदार व खासदारांची नावे वगळण्यात आल्याने महापालिकेने राजशिष्टाचाराचे (प्रोटोकॉल) उल्लंघन केल्याचा आरोप करत भाजपने महापालिकेत ठिय्या आंदोलन पुकारले आहे.
विरार पश्चिम येथे महापालिकेने प्रभाग समिती अ चे नवीन कार्यालय उभारले आहे. या कार्यालयाचा लोकार्पण सोहळा हा १३ मार्च २०२६ शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आला असल्याची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आली होती.महापालिकेकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.
निमंत्रण पत्रिका प्रसारित होताच त्यावर भाजपने आक्षेप नोंदवला आहे. या विरोधात पालिकेच्या मुख्यालयात आज भाजपच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन पुकारले आहे. तसेच आयुक्तांच्या कार्यालयाला घेराव घालत भजन म्हणत त्यांनी घडल्या या निमंत्रण पत्रिका प्रकरणाचा निषेध नोंदवला आहे.याबाबत बोलताना, निमंत्रण पत्रिकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधींचा अवमान केल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते मनोज पाटील यांनी केला आहे.
तसेच सदर निमंत्रण पत्रिकेतून पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत सवरा, वसई मतदारसंघाच्या आमदार स्नेहा दुबे-पंडित आणि बोईसरचे आमदार विलास तरे यांची नावे संपूर्णतः वगळण्यात आली आहेत, जे अत्यंत आक्षेपार्ह असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.तसेच जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचे नावही पत्रिकेत उचित ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेले नाही.
विशेष म्हणजे, नालासोपाऱ्याचे विद्यमान आमदार राजन नाईक यांचे नाव राजशिष्टाचारानुसार अग्रक्रमाने छापण्याऐवजी, ते माजी आमदार, माजी सभापती आणि माजी पदाधिकाऱ्यांच्या नावांच्या नंतर ‘विशेष उपस्थिती’ या विभागात अत्यंत खालच्या क्रमांकावर छापले आहे. हा केवळ लोकप्रतिनिधींचा अपमान नसून संविधानात्मक पदांचा अनादर असल्याचेही पाटील यांनी नमूद केले आहे.
या संपूर्ण प्रकरणाची दखल न घेतल्यास किंवा दोषींवर कारवाई न झाल्यास, विधानमंडळाच्या विशेषाधिकार समितीकडे तक्रार दाखल करण्यासह सर्व कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्याचा इशारा भाजपकडून देण्यात आला आहे.
