भाईंदर : वसई विरार महापालिकेच्या सर्वसाधारण महासभेत पुन्हा ‘राजदंड’ वापरण्याचा निर्णय महापौर अजीव पाटील यांनी  घेतला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

वसई विरार महापालिकेच्या निवडणुकांनंतर जवळपास पाच वर्षांनी नव्या लोकप्रतिनिधींची निवड झाली असून, ११५ सदस्यांच्या सभागृहात ४३ भाजप, शिवसेना (शिंदे ) १ तर ७१ नगरसेवक बहुजन विकास आघाडीचे निवडून आले आहेत. त्यामुळे बहुजन विकास आघाडीने एकहाती सत्ता स्थापन केली असून, महापौरपदाची धुरा अजीव पाटील यांच्या खांद्यावर आहे.

महापौरपद स्वीकारल्यानंतर मानधन न घेण्याचा निर्णय तसेच इतर काही भूमिकांमुळे पाटील चर्चेत आले आहेत.दरम्यान, चार महासभा पार पडल्यानंतर गुरुवारी झालेल्या  महापालिकेच्या सर्वसाधारण पाचव्या महासभेत त्यांनी ‘राजदंड’चा वापर सुरू केल्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

महासभेत अनेक वर्षांनंतर पुन्हा ‘राजदंड’ दिसून आल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आहेत.पारंपरिकदृष्ट्या  ‘राजदंड’हा महासभेतील शिस्त व अनुशासनाचे प्रतीक मानला जातो. मात्र, कामकाज नियमावलीनुसार सुरळीत चालत असल्याने राज्यातील बहुतांश महापालिकांतून हा  कालांतराने लुप्त झाला आहे.

अशा परिस्थितीत महापौर पाटील यांनी पुन्हा राजदंड वापरण्यास सुरुवात केल्याने या निर्णयामागील उद्देशावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. दरम्यान, महापौरांना राजदंड वापरण्याचा तसेच लाल दिव्याची सुविधा देण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचा दावा त्यांच्या सहकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.