​वसई: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रशासकीय कारभाराला गती देण्यासाठी तब्बल १२ वर्षांनंतर पालिकेचा नवा सुधारीत आकृतिबंध तयार करण्यात आला आहे. या नवीन प्रस्तावानुसार पालिकेत तब्बल ६ हजार ८२६ नवीन पदे निर्माण करण्यात येणार असून, यामुळे पालिकेच्या एकूण पदांची संख्या आता थेट ९ हजार ६७८ इतकी होणार आहे. नुकताच याबाबत प्रस्ताव महासभेत मंजूर करण्यात आला आला आहे.

​वसई-विरार महापालिकेची स्थापना २००९ मध्ये झाली. यामध्ये ४ नगरपरिषदा आणि ५३ गावांचा समावेश असून पालिकेचे एकूण क्षेत्रफळ ३११ चौरस किलोमीटर इतके विस्तीर्ण आहे. यापूर्वी ९ सप्टेंबर २०१४ रोजी शासनाने पालिकेच्या विविध संवर्गातील २ हजार ८५२ पदांना मंजुरी दिली होती. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या १२ लाख होती.

मात्र गेल्या काही वर्षात शहराच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे. या लोकसंख्येमुळे शहरातील नागरी व पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण पडत आहे. तर दुसरीकडे अपुऱ्या मनुष्यबळामुळे महापालिकेच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत होता. केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, प्रशासकीय कामकाजाला गती देणे आणि नागरिकांचे प्रश्न वेळेत सोडवणे पालिकेला कठीण जात होते. याच अनुषंगाने महापालिकेने जुन्या आकृतीबंधासह नवीन ६ हजार ८२६ पदांची निर्मिती असा एकूण ९ हजार ६७८ मनुष्यबळाचा प्रस्ताव नुकताच पार पडलेल्या महासभेत चर्चेसाठी ठेवण्यात आला. या आकृतीबंधावर विविध लोकप्रतिनिधींनी सविस्तर चर्चा केली. आरोग्य सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी सहायक आरोग्य अधिकारी, मानसोपचार तज्ज्ञ, तसेच बाल संगोपन व आरोग्य केंद्रांसाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची पदे भरण्यास प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली. आकृतीबंधातील सर्व तांत्रिक व प्रशासकीय बाबींचा सविस्तर अभ्यास करून, आरोग्य समिती व संबंधित विभागांच्या अभिप्रायानंतरच अंतिम मंजुरीची प्रक्रिया पुढे नेण्याचे निर्देश महापौर अजीव पाटील यांनी दिले. हा प्रस्ताव दुरुस्तीसह मंजूर करण्यात आला आहे. महापालिकेच्या विविध विभागात मनुष्यबळ वाढणार असल्याने दैनंदिन कामकाजाला गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

वरिष्ठ आणि तांत्रिक पदांमधील कपात

​नव्या आकृतिबंधात एकूण पदे वाढवली जात असली, तरी २०१४ च्या जुन्या आराखड्याच्या तुलनेत प्रशासनाने काही महत्त्वाच्या वरिष्ठ आणि तांत्रिक पदांमध्ये कपात केली आहे. यामध्ये आधी १५ मंजूर असलेल्या उपायुक्त पदांची संख्या आता १२ करण्यात आली आहे, म्हणजेच २ पदे कमी झाली आहेत. सहाय्यक आयुक्त पदे ३१ वरून २९ केली आहेत. सर्वाधिक १८ पदांची कपात पाणी पुरवठ्यातील नळजोडणी फिटर मध्ये झाली आहे. तर त्या पाठोपाठ अधीक्षक संवर्गात १५ पदांची कपात झाली असून ही पदे १०३ वरून ८८ वर आणली आहेत. याशिवाय तांत्रिक विभागातील उपअभियंता पदे ५८ वरून ४५ करण्यात आली आहेत. कनिष्ठ अभियंता (बांधकाम) पदे १३५ ऐवजी १२२ केल्याने १३ पदे, तर कनिष्ठ अभियंता (विद्युत) पदे २९ ऐवजी २६ केल्याने ३ पदे कमी झाली आहेत. तसेच वरिष्ठ आरोग्य निरीक्षकांची २३ मंजूर पदे आता थेट १२ वर आणण्यात आली आहेत.

सफाई कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ

​शहरातील नागरी सुविधा सुधारण्यासाठी आणि प्रशासकीय कामे जलद गतीने करण्यासाठी प्रशासनाने श्रेणी-३ आणि श्रेणी-४ मधील पदांमध्ये मोठी वाढ सुचवली आहे. यामध्ये सर्वाधिक वाढ सफाई कर्मचाऱ्यांच्या पदात करण्यात आली असून, आधी मंजूर असलेल्या ४९८ पदांवरून आता थेट २ हजार ८७५ पदे प्रस्तावित आहेत. मजुरांची पदे ७१ वरून ५४२, तर वाहन चालकांची संख्या अवघ्या २६ पदांवरून २९१ वर नेण्यात आली आहे. यासोबतच लिपिक-टंकलेखक पदांची संख्या ४०५ वरून ६५५ आणि वरिष्ठ लिपिकांची पदे १२७ वरून २०८ प्रस्तावित आहेत. शिपाई पदांची संख्या १२३ वरून २७५ करण्यात आली असून, मुकादम यांची मंजूर २३ पदे आता २२० वर नेण्यात आली आहेत.

शहर सुरक्षेला ही प्राधान्य

वसई विरार शहराच्या अग्निशमन विभागाच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ २२५ कर्मचाऱ्यांवर होती. मात्र नवीन आकृतीबंधानुसार ​शहराच्या सुरक्षेला आणि तातडीच्या सेवांना प्राधान्य दिले असून त्यात वाढ करण्यात आली आहे.मुख्य अग्निशमन अधिकारी१, उपमुख्य अग्निशमन अधिकारी २, विभागीय अग्निशमन अधिकारी ४, अग्निशमन केंद्रअधिकारी १५, उपकेंद्र अधिकारी १५, प्रमुख अग्निशमन विमोचक ४५, यंत्र चालक १२९ आणि अग्निशमन विमोचक ४८६ अशी एकूण ६८२ इतके मनुष्यबळ होणार आहे.

जुन्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य मिळावे

बैठकीत विरोधी व सत्ताधारी सदस्यांनी समान काम, समान वेतन आणि जुन्या कर्मचाऱ्यांच्या सेवा संरक्षणाचा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित केला. गेल्या ८-१० वर्षांपासून तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना डावलून नवीन थेट भरती झाल्यास त्यांच्यावर अन्याय होईल, त्यामुळे या कर्मचाऱ्यांना आकृतीबंधात आणि भरती प्रक्रियेत प्रथम प्राधान्य मिळावे अशी नगरसेवकांनी महासभेत केली.