वसई : वसई-विरार शहरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व अनधिकृत नळजोडण्या शोधून त्या खंडित करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहे. शहरात तीन हजारांहून अधिक नळजोडण्या असण्याची शक्यता असून त्याद्वारे दररोज ३० दशलक्ष लिटर पाणी वाया जात आहे,
शहरात उन्हाळय़ात भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. नागरिकांना पाणी मिळत नसल्याने टॅंकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. पालिकेने एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. मात्र प्रत्यक्षात दोन ते तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्याअभावी नागरिक हवालदिल झाले आहेत.
शहरात मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत नळजोडण्या असून त्यातून पाणी चोरी होते तसेच थेट मुख्य जलवाहिन्यांवरून पाणी चोरी होत असल्याने दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. शहरात तीन हजार बेकायदा नळजोडण्या असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आशिष पाटील यांनी दिली होती. त्यामुळे दरोरज ३० दशलक्ष लिटर पाणी वाया जात होते.
आता आयुक्त अनिल कुमार पवार यांनी या अनधिकृत नळजोडण्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. अनधिकृत नळजोडण्या शोधून त्या खंडित करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश त्यांनी पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत.