वसई: वसई विरार शहरातील प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिकेने कोट्यावधी रुपये खर्चून फॉग कॅनन यंत्र खरेदी केली आहेत. मात्र, ही यंत्रणा मुख्यालयाच्या आवारातच धूळखात उभी असल्याचे चित्र दिसून येत आहे. तर दुसरीकडे वाढत्या धूळ प्रदूषणाने नागरिक त्रस्त झाले आहेत.

वसई विरार शहराचे नागरीकरण वेगाने वाढत आहे. शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्यावरील वाढती वाहतूक व विविध ठिकाणी सुरू असलेले बांधकामांचे प्रकल्प यामुळे शहरात प्रदूषण वाढत आहे. घरातून बाहेर पडताच नागरिकांना प्रदूषणयुक्त वातावरणाला सामोरे जावे लागत आहेत. मुख्य रस्ते, महामार्ग, शहरातील अंतर्गत रस्ते अशा विविध ठिकाणच्या रस्त्यावरून ये-जा करताना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे.

प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने वसई विरार महापालिकेने राष्ट्रीय हवा शुद्धीकरण उपक्रमाच्या अंतर्गत पाच फॉग कॅनन वाहने खरेदी केली होती. यासाठी ३ कोटी २० लाख रुपये इतका निधी खर्च केला आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून पाण्याच्या अतिसुक्ष्म थेंबांची फवारणी करून हवेतील धूलिकण नियंत्रण करणे, त्या वाहनात १० हजार लीटर पाणी साठवून सूक्ष्म आकाराच्या नोझल्समधून पाण्याची फवारणी करून हवेत उडणारी धूळ नियंत्रणात येऊ शकते.

मात्र, प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिकेने खरेदी केलेली फॉग कॅनन वाहने योग्यरित्या कार्यान्वित करण्यात येत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
एकीकडे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच प्रदूषण नियंत्रणासाठी खरेदी केलेली वाहने सुरू नसल्यामुळे प्रदूषण नियंत्रण करणार कसे, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

पालिकेने कोट्यावधी रुपये खर्चून प्रदूषण नियंत्रण वाहने घेतली आहेत. मात्र, त्यांचा नागरिकांच्या हितासाठीच उपयोग होणे आवश्यक असताना अशी वाहने धूळखात उभी ठेवून महापालिका काय साध्य करीत आहे, असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

नागरी आरोग्य धोक्यात

सद्यस्थितीत शहरातील जवळपास सर्वच ठिकाणच्या प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. ते नियंत्रित करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून जी वाहने खरेदी केली आहेत. ती सर्व ठिकाणी अधूनमधून फिरविणे आवश्यक आहे. जागोजागी धूळ प्रदूषण निर्माण झाल्याने तीच धूळ नाका तोंडात जाऊन श्वसनाचे आजार ही वाढत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

यंत्र सुरूच पालिकेचा दावा

वसई विरार शहरात पालिकेकडून प्रदूषण नियंत्रणासाठी रस्ते सफाई वाहने व फॉग कॅनन वाहने धूळ विविध ठिकाणच्या भागातील रस्त्यावर सुरू करण्यात आली असल्याचा दावा करण्यात आला आहे. वाहन चालकांना त्याबाबतचे वेळापत्रक ही निश्चित करून देण्यात आले असून प्रदूषण नियंत्रणासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत असे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे.

या कारणांमुळे प्रदूषणात वाढ

  • वर्दळीच्या ठिकाणी सुरू असलेल्या खाजगी बांधकाम प्रकल्पांमुळे धूळ प्रदूषणात वाढ
  • जलवाहिनी अंथरणे, रस्ते दुरुस्ती, असे, महापालिकेचे संथ गतीने सुरू असणारे प्रकल्प
  • शहराच्या वेशीवर सुरू असणारे आरएमसी प्लांट
  • नियमांचे उल्लंघन करून बांधकाम साहित्य आणि डेब्रिजची वाहतूक करणारी अवजड वाहने
  • विविध प्रकल्पांमुळे कमी होत जाणारे हरित क्षेत्र
  • बंद असलेली हवा प्रदूषण मोजमापन स्थानके
  • राज्यशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा अभाव