वसई विरार महापालिकेने २०२५- २०२६ या आर्थिक वर्षात विक्रमी मालमत्ता कर वसुली केली आहे.मार्च अखेर पर्यंत महापालिकेच्या तिजोरीत ३९४.२० कोटींची मालमत्ता कर वसूल झाला असून आणखीन काही धनादेश वटविल्यानंतर चारशे कोटींचा कर वसुलीचा टप्पा पार होणार आहे. वसई विरार महापालिका हद्दीत १० लाख १६ हजार एवढ्या मालमत्ता आहेत. त्यात छोट्या मोठ्या औद्योगिक वसाहती, उपहारगृहे, इमारती, सदनिकाआदींचा समावेश आहे.
यातून मिळणारा मालमत्ता कर हा प्रमुख स्रोत आहे. त्यातून उत्पन्न स्वरूपात मिळणारा निधी हा विकास कामांसाठी महत्त्वाचा ठरतो. गेल्या वर्षी महापालिकेने ३९३ कोटींची कर वसुलीकरीत उच्चांक गाठला होता. त्यामुळे २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात मालमत्ता कर वसुलीचा त्याहून अधिक उच्चांक गाठण्यासाठी ८६० कोटींचे उद्दिष्ट निश्चित केले होते.
त्यानुसार नियोजन ही आखले होते. मात्र निवडणूक कालावधी, पूरस्थिती व अन्य विविध कामकाजात कर्मचारी व्यस्त असल्याने मालमत्ता कर वसुलीवर मोठा परिणाम झाला होता. सुरुवातीच्या आठ महिन्यात केवळ २२८ कोटींचा कर वसूल झाला होता. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षात वसूल केलेल्या कर रक्कमेचा टप्पा गाठला जाईल की नाही अशी शंका उपस्थित केली जात होती.
मात्र महापालिकेच्या कर संकलन विभागाने अखेरच्या दोन ते तीन महिने अभय योजना, शास्ती माफी अशा सवलती जाहीर केल्या. तर उद्योजकांच्या ही बैठक घेत कर भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. ३१ मार्च पर्यंत महापालिकेच्या तिजोरीत ३९४. २० कोटींचा मालमत्ता कर जमा झाला आहे. तर अजून काही धनादेश ही जमा झाले आहेत. ते वटल्यानंतर मालमत्ता करांचा आकडा हा चारशे कोटींच्या वर जाईल असा दावा महापालिकेने केला आहे. महापालिकेने केलेली आजवरची विक्रमी कर वसुली आहे.
मालमत्ता करवसुली आकडेवारी
वर्ष कर वसुली
२०२१-२२- ३२१ कोटी
२०२२-२३ – ३७१ कोटी
२०२३-२४- ३३८ कोटी
२०२४-२५- ३९३ कोटी
२०२५-२६- ३९४.२० कोटी
तीनशेहून अधिक नळजोडण्या खंडित
वसई विरार शहरात अनेक मालमत्ता धारक वारंवार सूचना देऊनही कर भरणा करण्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा कर थकीत राहत आहेत. विशेषतः मोठ्या थकबाकीदारांना लक्ष्य करीत अशा मालमत्ता धारकांच्या नळजोडण्या खंडित करण्याची कारवाई महापालिकेने सुरू केली होती. आतापर्यंत तीनशेहून अधिक नळजोडण्या खंडित करण्यात आल्या असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.
