वसई: वसई विरार शहर महापालिका क्षेत्रातील स्वच्छतेच्या तक्रारींचे तातडीने निवारण व्हावे यासाठी महापालिकेने तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. मंगळवारी महापालिका मुख्यालयात महापौर अजीव पाटील यांच्या हस्ते ‘सफाई मित्र’ या विशेष मोबाईल ॲपचे लोकार्पण करण्यात आले. या प्रणालीमुळे नागरिकांना रस्त्यावर पडलेल्या कचऱ्याचे फोटो थेट महापालिकेला पाठवता येणार असून त्यावर स्वच्छता विभागाकडून २४ तासांत कारवाई करणे बंधनकारक असणार आहे. कचरा उचलला न गेल्यास संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई देखील केली जाणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
वसई विरार शहरात महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून शहरातील दैनंदिन स्वच्छता केली जाते व जमा होणारा कचरा क्षेपणभूमीवर नेऊन टाकला जातो. मात्र, शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे कचऱ्याचे प्रमाण अधिकच वाढू लागले आहे. बहुतेक जण कचरा कचरा कुंडीत न टाकता थेट रस्त्यावर टाकतात, काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला ही कचऱ्याचे ढिगारे साचून राहतात. यामुळे आजूबाजूच्या परिसरात अस्वच्छता व दुर्गंधी निर्माण होते. याशिवाय आरोग्य विषयक समस्यांना ही तोंड द्यावे लागते.
नागरिकांच्या अस्वच्छते विषयक वाढत्या तक्रारी लक्षात घेता. महापालिकेने आता ‘सफाई मित्र ॲपच्या’ मदतीने या समस्या सोडविण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिकेने सफाई मित्र ॲप सुरू आहे. नुकताच या ॲपचे लोकार्पण करण्यात आले आहे. यावेळी महापौर अजीव पाटील, उपमहापौर मार्शल लोपीस, आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी, सभागृह नेते प्रफुल्ल साने, विरोधी पक्ष नेते मनोज पाटील, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, दीपक सावंत यांच्यासह पालिकेचे वरिष्ठ अधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.
कसे काम करणार ‘सफाई मित्र’?
हे सफाई मित्र ॲप हे अँड्रॉइड फोनवर डाऊनलोड करता येईल. शहरात कोठेही अस्वच्छता आढळल्यास नागरिक त्या जागेचा फोटो काढून या ॲपवर अपलोड करू शकतात. ही तक्रार प्राप्त होताच संबंधित प्रभागाच्या स्वच्छता विभागाला त्याची माहिती मिळेल. विशेष म्हणजे, तक्रार मिळाल्यापासून २४ तासांच्या आत त्या जागेची स्वच्छता करणे प्रशासनाला आवश्यक असणार आहे. जर त्या ठेकेदाराने तो कचरा उचलला नाही तर त्याला १० हजार रुपये इतका दंड आकारला जाणार आहे. याशिवाय जे नागरिक सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवतील त्यांना ही एक हजार रुपये इतका दंड केला जाईल असा इशारा महापालिकेने दिला आहे. मोबाईल ॲपशिवाय वेब पोर्टलद्वारेही तक्रारी नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सद्यस्थितीत हे सफाई मित्र ॲप प्रयोगिक तत्वावर सुरू केले असल्याचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.
प्रशासन आणि नागरिकांचा थेट संवाद
स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून ती एक लोकचळवळ व्हावी, अशी अपेक्षा महापौर अजीव पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. “या सफाई मित्र ॲपमुळे तक्रार निवारण प्रक्रियेत पारदर्शकता येईल आणि शहर स्वच्छ ठेवण्यास मोठी मदत होईल,” असेही त्यांनी सांगितले. तर, आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले की, या प्रणालीमुळे कचरा संकलन आणि व्यवस्थापनावर बारकाईने लक्ष ठेवणे पालिकेला शक्य होणार आहे.
