वसई:- वसई विरार महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी वसईत काम बंद आंदोलन केले. यात चारशे ते पाचशे सफाई कर्मचारी सहभागी झाले आहेत. महापालिकेने जुना ठेका बदलून नवीन ठेकेदार नियुक्त केला आहे. असे जरी असले तरी अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यात याव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे.
वसई विरार महापालिकेत मागील अनेक वर्षांपासून हजारोंच्या संख्येने सफाई कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करतात. रस्त्यावर झाडलोट करणे, दैनंदिन कचरा गोळा करून क्षेपणभूमीवर नेऊन टाकणे, औषध फवारणी, गटार स्वच्छता अशी कामे त्यांच्यामार्फत केली जातात. मात्र या कर्मचाऱ्यांना पालिकेकडून विविध सोयीसुविधा उपलब्ध होत नाही त्यामुळे विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत पालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जात आहे.
आता महापालिकेने नियुक्त केलेले यापूर्वीचे ठेकेदाराचा ठेका २० जानेवारी पासून रद्द करण्यात आला असून त्याठिकाणी २०२५-२६ ते २०३०-३१ या पाच वर्षांसाठी नवीन ठेकेदार नियुक्त करण्यात आला आहे. त्यामुळे यापूर्वीच्या ठेकेदारांना काम बंद करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत.
मात्र या आदेशानंतर शहराची दैनंदिन स्वच्छता करणारे सफाई कर्मचारी आक्रमक होत आंदोलन सुरू केले आहे. मंगळवारी वसई पश्चिमेच्या साईनाथ नगर भागात एकत्र येत कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. गेली अनेक वर्षे आम्ही काम करतो. भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युटी यासह इतर लाभ अजूनही आम्हाला मिळालेले नाहीत अशात ठेका बदलून पालिकेने सफाई कर्मचाऱ्यांकर अन्याय करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
नवीन ठेकेदाराला आमचा विरोध नाही परंतु आमच्या कर्मचाऱ्यांचे जे लाभ आहेत ते कधी मिळणार असा प्रश्न सफाई कर्मचारी गीतेश घरत यांनी उपस्थित केला आहे.
समान वेतन, भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युटी यासह इतर लाभ आम्हाला मिळाले पाहिजे याशिवाय जे यापूर्वी सफाई कर्मचारी निवृत्त झाले आहेत तर काही जण मयत ही झाले आहेत त्यांनाही हे लाभ देण्यात आले नाही असे घरत यांनी सांगितले. ठेका काढताना तेथील कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या ज्या प्रलंबित मागण्या होत्या त्याचा विचार होणे आवश्यक आहे असे मत सफाई कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
दैनंदिन स्वच्छतेवर परिणाम
वसई विरार शहराची लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे दैनंदिन निघणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण ही अधिक आहे. मात्र मंगळवारी सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केल्याने त्याचा परिणाम दैनंदिन स्वच्छतेवर झाला आहे. त्यामुळे शहरातील अनेक ठिकाणच्या भागात कचऱ्याचे ढीग जैसे थे पडून आहेत.
त्यामुळे नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. सफाई कर्मचारी हे स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून स्वच्छता करतात. त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करून दैनंदिन स्वच्छता सुरळीत करावी अशी प्रतिक्रिया जागरूक नागरिकांनी दिली आहे.
